गेला आठवडभर सुरू असलेला विश्वरूपम चित्रपटाचा वाद अखेर निवळला आहे. अभिनेता कमल हासन आणि मुस्लीम संघटनांमध्ये शनिवारी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर वादग्रस्त भाग वगळून विश्वरूपम चित्रपटाचा तामिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये झळकण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
गृहसचिव आर. राजगोपाल यांच्या उपस्थितीत सचिव कार्यालयात झालेल्या तब्बल सहा तासांच्या दीर्घ चर्चेनंतर कमल हासन यांनी चित्रपटातील काही भाग वगळण्यास सहमती दर्शवली.
चित्रपटातील काही भाग मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचा आरोप करीत मुस्लीम संघटनांनी विश्वरूपम चित्रपटावर तामिळनाडूत बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे तामिळनाडू सरकारने चित्रपटावर बंदी घातली होती.
तामिळनाडू मुस्लीम मुन्न्ोत्र कळघम या संघटनेचे प्रतिनिधी आमदार एम. एच. जवाहिरउल्ला यांनी सांगितले की, कमल हासन यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळण्यास सहमती दर्शवली आहे. कमल हासन आणि आमच्यातील चर्चा सफल झाल्याचेही जवाहिरउल्ला यांनी सांगितले.
मुस्लीम संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तामिळनाडू सरकार चित्रपटावरील बंदी उठवेल आणि लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख घोषित करण्यात येईल, असे कमल हासन यांनी सांगितले. तसेच बंदी प्रकरणावरून राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही मागे घेण्यात येईल, असेही कमल हासन यांनी स्पष्ट केले.

Story img Loader