बिहार निवडणुकीच्या प्रचारापासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दूर राहावे अशी जद(यू) आणि राजदची इच्छा असल्याने राहुल गांधी हे ‘सक्तीच्या रजेवर’ गेले असल्याची टीका भाजपने केली आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.
काँग्रेस पक्ष आता आपल्या तारणकर्त्यांच्या शोधात असून ते पक्षाच्या निवेदनांमधूनच स्पष्ट होत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. राहुल गांधी हे वैयक्तिक कामासाठी गेल्याचे प्रथम पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
राहुल गांधी हे बिहारच्या आसपास जरी राहिले तरी ते निवडणुकीसाठी घातक असल्याचे सांगण्यात आल्यानेच राहुल गांधी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असावे, असेही ते म्हणाले. बिहारमधील जाहीर सभेला अनुपस्थित राहून नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांनी राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचेही पात्रा म्हणाले.
दरम्यान राहुल हे ‘वीकएण्ड विथ चार्ली रोझ’ या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला गेले असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगितले.