दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या पाश्र्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी दक्षिण कोरियाने पुढे केलेला चर्चेचा प्रस्ताव उत्तर कोरियाने फेटाळला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याची चिन्हे धूसर झाली आहेत.
दोन्ही देशांमधील संयुक्तपणे सुरू असलेल्या कारखान्यांच्या कामावर झालेला परिणाम आणि इतर महत्त्वाच्या मुद्दय़ांवर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी गेल्या आठवडय़ात दक्षिण कोरियाने उत्तर कोरियासमोर चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. मात्र उत्तर कोरियाने चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. जोपर्यंत दक्षिण कोरिया आपली वादावादीची भूमिका सोडत नाही, तोपर्यंत उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या चर्चेला तयार नसल्याचे प्योंगयांगच्या सरकारी समितीच्या सूत्राने म्हटले आहे. उत्तर कोरियाकडून सेऊलवर हल्ला करण्याची भीती निर्माण झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी अणुचाचणी केल्यामुळे उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांनी र्निबध घातले आहेत. त्यामुळे उत्तर कोरिया कमालीचा संतप्त झाला असून दक्षिण कोरियाविरोधात अधिक आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा