काही महिन्यांपूर्वी चीनने उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचे अवशेष जमिनीवर पडल्याने चीनचे उपग्रह प्रक्षेपण वादात सापडले होते. असं गेल्या काही वर्षात किमान तीन वेळा घडून आलं आहे. २०२२ मध्ये एप्रिल महिन्या विदर्भातील काही भागात रात्री आकाशातून काही वस्तू जळत जमिनीवर पडल्याचं हजारो नागरीकांनी पाहिलं होतं, काही दिवसानंतर ते चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचं स्पष्ट झालं होतं.
असं असतांना आता यावेळी चर्चेत रहाण्याची वेळ भारतावर- इस्रोवर आलेली आहे. इस्रोने काल रविवारी म्हणजेच ३० जुलैला PSLV या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरचे उपग्रह प्रक्षेपित केले होते. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील श्रीहरीकोटवरुन आग्नेय दिशेला हे प्रक्षेपण झाले होते. इस्रोच्या प्रक्षेपकाचे – रॉकेटचे विविध टप्पे हे ज्वलन प्रक्रिया झाल्यावर वेगळे होतात आणि अवकाशातून जमिनीच्या दिशेने येतांना वातावरणात जळून नष्ट होतात. मात्र यापैकी एक वस्तू ही ऑस्ट्रेलियातील Jurien Bay या किनाऱ्यावर आढळून आली आहे.
हेही वाचा… Chandrayaan 3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आज मध्यरात्रीपासून, नेमकं काय होणार? वाचा
ऑस्ट्रेलियाच्या अवकाश एजन्सीच्या @AusSpaceAgency या ट्विटर वरुन याबाबत दुजोरा देण्यात आला आहे. एक वस्तू किनाऱ्यावर आढळून आली असून ती PSLV रॉकेटच्या तिसऱ्या टप्पातील भाग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत आणखी माहिती घेण्यासाठी इस्रोशी संपर्कात असल्याचं म्हंटलं आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live :आमदार यशोमती ठाकूर यांना ठार करण्याची धमकी, प्रतिक्रिया देत म्हणाल्या..
इस्रोच्या प्रक्षेपकाचे अवशेष हे अवकाशात पुर्णपणे नष्ट न होता ते जमिनीवर पडले असले तरी यामुळे कोणतीही जीवीतहानी झाल्याचे किंवा अन्य नुकसान झाल्याचे वृत्त नाही.