पीटीआय, बंगळूरु
लॉस एंजलिस येथे २०२८ साली होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-२० क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशामुळे खेळाच्या जगभरातील वाढीस हातभार लागणार असून त्याबरोबरच व्यवसायाच्या कक्षाही रुंदावणार असल्याचे मानले जात आहे.
तब्बल अडीच अब्ज चाहतावर्ग आणि प्रसारण हक्कांच्या दरांमध्ये सातत्याने होणारी वाढ या निकषांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलनंतर क्रिकेट हा दुसरा लोकप्रिय खेळ ठरतो. प्रामुख्याने राष्ट्रकुल परिवारात प्रसिद्ध असलेल्या या खेळात भारताचे ७० टक्के वर्चस्व आहे. आता ऑलिम्पिक समावेशाने ही सर्व गणिते वेगाने बदलणार आहेत. अन्य देशांमध्येही क्रिकेटच्या वाढीला संधी निर्माण झाली असून आगामी काळात वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय संघाला आपली गुणवत्ता अधिक वाढवावी लागेल.
ऑलिम्पिकचे पदक गळय़ात घालून मिरवणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानास्पद असते. आता हा आनंद क्रिकेटपटूंनाही साजरा करता येणार आहे. अर्थात, क्रिकेटची लोकप्रियता वाढणार असली तरी त्याची तुलना फुटबॉलशी करता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० पुरुष क्रमवारीत ८७, तर महिला क्रमवारीत ६६ देश येतात. त्याच वेळी ‘फिफा’ क्रमवारीत २०७ पुरुष आणि १८६ महिला संघ आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक आणि लोकप्रियतेमध्ये या दोन खेळांची तुलना होऊ शकत नाही. असे असले तरी ट्वेन्टी-२० क्रिकेट आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेमध्ये वेगाने लोकप्रिय होत असल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. क्रिकेटच्या ट्वेन्टी-२० प्रारूपाने लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. जागतिक स्तरावर मोठय़ा प्रमाणावर लीग आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. आता ऑलिम्पिक समावेश हे क्रिकेटसाठी विश्वचषक स्पर्धेपेक्षा अधिक मोठे व्यासपीठ ठरू शकते, असा एक मतप्रवाह आहे.
हेही वाचा >>>पुन्हा सत्तेवर आल्यास काँग्रेसचे ‘तुष्टीकरणाचे राजकारण’; छत्तीसगडच्या प्रचारसभेत अमित शहा यांचा आरोप
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑलिम्पिक समावेशाचा निर्णय हा २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी झाला असला, तरी २०३२ची स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार असून तो क्रिकेटमधील दर्जेदार संघ आहे. त्यामुळे या स्पर्धेची संयोजन समिती क्रिकेटला वगळण्याचा निर्णय घेणार नाही. त्यानंतर २०३६ मध्ये भारत आयोजनासाठी उत्सुक आहे. तसे झाले तर क्रिकेटचा समावेश अपरिहार्य असेल. सध्या तरी पुढील तीन स्पर्धात क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>राघव चढ्ढांच्या याचिकेवर राज्यसभेच्या सचिवालयाला नोटीस
क्रिकेटच्या लोकप्रियतेत थेट प्रसारणाचा वाटा मोठा आहे. अलीकडे एकटय़ा ‘बीसीसीआय’ची तिजोरी प्रसारण हक्क्यांच्या कराराने भरभरून वाहत आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाची बातमी व्यावसायिकांसाठी मोठी आहे. ऑलिम्पिक समावेशामुळे लॉस एंजलिस स्पर्धेपर्यंत क्रिकेट सामन्यांच्या प्रसारण हक्कांच्या विक्रीत सध्यापेक्षा २० ते ३० टक्क्यांनी वाढ होईल असा प्राथमिक अंदाज आहे.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे या खेळासाठी नव्या सीमा उघडल्या जाणार आहेत. जागतिक बाजारपेठेतही क्रिकेटचे आकर्षण वाढेल. मैदानासह मैदानाबाहेर व्यावसायिक स्पर्धा तीव्र होईल. तरुणांच्या विकासाला चालना मिळेल. कुशल व्यावसायिकांसाठी ही मोठी संधी असेल. – जय शहा, सचिव, बीसीसीआय