डिझेल आणि स्वयंपाकाच्या इंधनाच्या दरात वाढ करण्याबरोबरच सवलतीच्या दरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची मर्यादा वाढविण्याचा निर्णय सरकार शक्य तितक्या लवकरच  घेईल, असे पेट्रोलियममंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी येथे सांगितले.
डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये वाढ करून स्वयंपाकाचे इंधन कमी दराने विकून अपेक्षित असलेला एक लाख ६० हजार कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्याच्या पर्यायावर यूपीएच्या नेतृत्वाने चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या.
तथापि, पेट्रोलियम मंत्रालयाने कोणता प्रस्ताव तयार केला आहे आणि दरवाढीचा निर्णय केव्हा आणि कोठे घेतला जाईल, हे स्पष्ट करण्यास मोईली यांनी नकार दिला. निर्णय घेतला जाईल तेव्हा तो तुम्हालाच पहिल्यांदा कळेल, असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले.
पेट्रोलियम मंत्रालयाने राजकीय व्यवहार कॅबिनेट कमिटीपुढे ठेवलेला प्रस्ताव विजय केळकर समितीने केलेल्या शिफारशींवर आधारित आहे. केळकर समितीच्या शिफारशींवर गांभीर्याने विचार केला जात आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर चार रुपये, केरोसिनच्या दरात प्रति लिटर दोन रुपये आणि स्वयंपाकाच्या प्रति सिलिंडरमागे ५० रुपये वाढ त्वरित करावी, अशी शिफारस केळकर समितीने केली आहे.
मोबाइल दूरध्वनी सेवेच्या धर्तीवर सरकारने स्वयंपाकाच्या गॅस ग्राहकांसाठी डीलर बदलण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मोबाइल ग्राहकांना विविध मोबाइल कंपन्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी गॅस ग्राहकांना केवळ डीलरच बदलता येणार आहे, तेल कंपनीमध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे आपण इंडियन ऑइल कंपनीच्या इंडेन गॅसचे ग्राहक असाल तर आपल्याला आपल्या विभागातील डीलर बदलता येईल, मात्र आपल्याला त्याऐवजी भारत पेट्रोलियमचा भारत गॅस अथवा हिंदुस्थान पेट्रोलियमचा एचपी गॅस घेता येणार नाही. शुक्रवारपासून डीलर बदलण्याची सेवा चंदीगढमधून सुरू करण्यात आली असून लवकरच ती किमान २५ जिल्ह्य़ांमध्ये सुरू करण्यात येणार आहे, असे मोईली म्हणाले.

Story img Loader