मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी निर्णय देणार आहे. फाशीच्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे वॉरंट काढण्यात आल्यामुळे याकुब मेमनने गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
गेल्याच आठवड्यात त्याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे त्याला फाशी होणार हे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निकालापूर्वीच वॉरंट काढल्याचा मुद्दा उपस्थित करून याकुब मेमनने पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. गेल्या आठवड्यात न्यायालयाने त्याची याचिका दाखल करून घेतल्यानंतर सोमवारी सकाळी त्यावर सुनावणी झाली. मंगळवारी सकाळी न्यायालयात पुन्हा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार असून, त्यानंतर यावर निर्णय देण्यात येणार आहे.
याकुब मेमन याने राज्यापालांकडे दयेचा अर्जही केला असून, तो फेटाळून लावावा, अशी शिफारस खुद्द राज्य शासनानेच राज्यापालांना केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयातील त्याच्या याचिका अर्जावर सुनावणी पूर्ण होऊन निकाल येईपर्यंत वाट बघण्याचा निर्णय राजभवनाने घेतला असल्याचे समजते.

Story img Loader