दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६० वर्षांच्या एका माजी नौदल कर्मचाऱ्याला तिहेरी हत्या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात जो आरोपी आहे तो १९ वर्षांपूर्वी मृत घोषित झाला होता. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. बलेश कुमार असं या आरोपीचं नाव आहे. आपला मृत्यू झाल्याचा बनाव त्याने रचला होता आणि मागच्या १९ वर्षांपासून बनावट ओळखपत्र आणि इतर सगळी कागदपत्रं तयार करुन वावरत होता. आता त्याला दिल्ली पोलिसांनी तिहेरी हत्या प्रकरणात अटक केली आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलेश कुमारला नजफगढ या भागातल्या एका घरातून अटक करण्यात आली. बलेश कुमार हा या ठिकाणी अमन सिंह या बनावट ओळखीने राहात होता. त्याच्या बरोबर त्याचं कुटुंबही होतं. २००४ मध्ये बलेशने त्याचा नातेवाईक असलेल्या राजेश उर्फ खुशीरामची हत्या केली. राजेशच्या पत्नीशी बलेश कुमारचे कथित रुपाने अनैतिक संबंध होते. पोलिसांनी २००४ मध्ये बलेशचा भाऊ सुंदर लालला अटक केली होती. कारण राजेशच्या हत्येत त्याचाही सहभाग होता. २००४ मध्ये पोलिसांना गुंगारा देऊन पळण्यात बलेश कुमार यशस्वी झाला.
विशेष पोलीस आयुक्त रवींद्र यादव (गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या माहितीनुसार २००४ मध्ये बलेश ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. त्यावेळी तो एका ट्रकने राजस्थानला पळाला. त्यानंतर त्याने या ट्रकला आग लावली आणि दोन मजुरांनाही जाळून मारलं. तसंच स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. राजस्थान पोलिसांनी या घटनेची नोंद घेत हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी बलेश याचा मृत्यू झाला हे वाटल्याने त्याला मृत घोषित करुन ती फाईल बंद केली. यानंतर बनावट कागदपत्रं तयार करुन आणि खोटं नाव धारण करुन बलेश कुमार त्याच्या कुटुंबासह राहू लागला.
पोलीस उपायुक्त अंकित कुमार यांनी ही माहिती दिली की हा सगळा प्रकार झाल्यानंतर बलेश त्याच्या पत्नीच्या संपर्कात होता. त्याने नौदलातून त्याचा प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन या सगळ्या गोष्टी कशा मिळवायच्या हे पत्नीला सांगितलं होतं. तसंच जळालेल्या ट्रकचा वीमा उतरवला होता. त्याचे पैसे मिळवण्यासाठीचीही माहिती पत्नीला दिली. पत्नीच्या खात्यावर जे पैसे जमा झाले ते बलेश कुमारला मिळाले. त्यानंतर हरयाणातल्या पानिपतमध्ये राहणारा बलेश हा दिल्लीतल्या नजफगढ भागात आला आणि कुटुंबासह राहू लागला. इथे येऊन तो अमन सिंह या नावाने प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होता. पोलिसांना त्याच्या विषयी गुप्त माहिती मिळाली. त्यावेळी त्याला घरी जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि २००४ च्या प्रकरणाविषयी विचारलं तेव्हा आपण आपल्या नातेवाईकाला आणि दोन मजुरांना ठार मारल्याची कबुली त्याने दिली. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आपणच आपल्या मृत्यूचा बनाव कसा रचला हे देखील त्याने पोलिसांना सांगतिलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.