देशातील अन्नधान्य उत्पादनात २०१२-२०१३ या पीकवर्षांत साडेतीन टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज आहे. या वर्षांत २५०.१४ दशलक्ष टन एवढे उत्पादन अपेक्षित आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमधील दुष्काळी स्थितीचा फटका या वर्षी अन्नधान्य उत्पादनाला बसला असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
ते राष्ट्रीय बियाणे संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी २६ कोटी टन एवढे अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. या वर्षी दुष्काळी स्थिती असूनही आपल्याला २५ कोटी टन अन्नधान्य उत्पादनाचा टप्पा गाठण्यात यश येत आहे. देशांतर्गत गरज भागविण्यास हे उत्पादन पुरेसे ठरेल.’’
अपुऱ्या पावसामुळे या वर्षी भात आणि भरड धान्याच्या उत्पादनांवर विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या पीकवर्षांत म्हणजे जुलै ते जून २०११-१२ मध्ये अन्नधान्याचे २५ कोटी ९३ लाख टन असे विक्रमी उत्पादन झाले होते.
केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अन्नधान्य उत्पादनाचा दुसऱ्या सुधारित अंदाज शुक्रवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यानुसार, २०१२-१३ या पीकवर्षांत भात उत्पादनात १०१.८ दशलक्ष टनांनी घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी भाताचे उत्पादन १०५.३१ दशलक्ष असे विक्रमी स्वरूपाचे होते. गव्हाचे उत्पादन या वर्षांत ९ कोटी २३ लाख टन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ते ९ कोटी ४८ टन एवढे होते. कापसाच्या उत्पादनात ३.५२ कोटी गासडय़ांवरून ३.३८ कोटी गासडय़ा अशी घट अपेक्षित आहे.
राज्यातील पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर
अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी प्यायला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. पाणी व चाऱ्याचा प्रश्न हे दीर्घ संकट असून त्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे. महाराष्ट्रात अशी गंभीर परिस्थिती कधीही नव्हती. पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे. राज्यातील जनतेने पाण्याच्या वापराबाबत थोडीशी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आकुर्डी येथे शुक्रवारी केले.

Story img Loader