संख्येत लक्षणीय घट; अमेरिकेच्या वन्यजीव संस्थेचा अहवाल
आफ्रिका व भारतातील सिंहाची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या प्रजाती यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकी मत्स्य व वन्यजीव सेवा संस्थेने म्हटले आहे की, पँथेरा लिओ (सिंहाची प्रजात) ही भारतात तसेच पश्चिम व मध्य आफ्रिकेत आढळते, ती धोक्यात आली आहे. पूर्व व दक्षिण आफ्रिकेतील पँथेला लिओ मेलानोचॅटा या प्रजातीचे अस्तित्वही यापुढील काळात धोक्यात येणार आहे. धोक्यात येत असलेल्या प्राण्यांच्या संभाव्य यादीत सिंहाच्या या प्रजातीचा समावेश आहे. त्यामुळे काही वर्षांनी केवळ चित्रात पाहायचा प्राणी म्हणून सिंहाची वर्णी लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सिंहाची तस्करी रोखण्यासाठी एक धोरण आखले असून त्यानुसार वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. आर्थिक साधने अपुरी पडत असल्यानेही सिंहांना वाचवण्यात अपयश येत आहे.
नव्या पाहणीनुसार पश्चिम व मध्य आफ्रिकेत सिंहांची संख्या कमी झाली असून ते आशियायी सिंहाच्या प्रजातीशी संबंध असलेले सिंह आहेत. आता त्यातील १४०० सिंह राहिले असून आफ्रिकेत ९००, तर भारतात ५२३ सिंह आहेत.
सिहांच्या जिवाला अनेक धोके आहेत, त्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्यांना धोक्यातील प्रजाती कायद्यानुसार वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांचा समावेश धोक्याच्या यादीत करण्यात आला आहे.
पी एल मेलॅनोचॅटा या प्रजातीचे अवघे १७ ते १९ हजार सिंह आता दक्षिण व पूर्व आफ्रिकेत उरले आहेत, ही प्रजाती अजून धोक्यात नाही. २० वर्षांत सिंहांची संख्या अधिवास नष्ट झाल्याने ४३ टक्क्यांनी कमी झाली. त्यांना आता शिकारही मिळत नाही व माणूसच त्यांची शिकार करीत आहे.
सिंह हा आपला जागतिक वारसा आहे. सिंहांची संख्या वाढवायला हवी व आफ्रिकेतील सॅव्हानाच्या जंगलात, तसेच भारतातील जंगलात त्यांचा वावर दिसला पाहिजे. ते आता आफ्रिका व भारतातील लोकांवर सोडून चालणार नाही,
– डॅन अॅश, संचालक, अमेरिकी मत्स्य व वन्यजीव सेवा संस्था