पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे भारताने बंदी घातलेल्या ‘इंडियन मुजाहिदिन’ या अतिरेकी संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांशी घनिष्ठ  संबंध असून, भारतात ‘वाँटेड’ असलेल्या या अतिरेक्यांना आयएसआय आश्रय देते, असा स्पष्ट आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे.
देशात मोठय़ा प्रमाणावर अतिरेकी कारवाया घडवून आणल्याच्या आरोपावरून एनआयएने इंडियन मुजाहिदिनच्या २० संशयित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये इंडियन मुजाहिदिनचे कथित संस्थापक रियाझ भटकळ आणि इक्बाल भटकळ या फरारी अतिरेक्यांचाही समावेश आहे. एनआयएने आज यासंदर्भात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आयएसआय आणि आयएमच्या घनिष्ठ संबंधांचा दावा केला.
रियाझ भटकळ आयएसआयच्या घनिष्ठ संपर्कात होता. आयएसआयने आयएमच्या अतिरेक्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे भरवली आहेत. तसेच रियाझसह भारताला हव्या असलेल्या अनेक अतिरेक्यांनाही आश्रय दिला आहे, असे तपासात निष्पन्न झाल्याचे एनआयएतर्फे सांगण्यात आले. इक्बाल भटकळ संघटनेसाठी पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात तसेच अन्य मदतीसाठी आयएसआयशी संपर्क राखून असून तो पाकिस्तानातच आहे, असेही उघड झाल्याचे एनआयएतर्फे सांगण्यात आले. आयएसआय आणि आयएम यांच्या संबंधांचे आणखीही अनेक पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या आरोपपत्रात दिले आहेत. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातील २० पैकी तहसिन अख्तर, हैदर अली आणि झिया-उर-रहमान या तिघांव्यतिरिक्त इतरांना अद्याप पकडण्यात यश आलेले नाही. हे तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा