शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी अचानक बंड केल्याने त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. माध्यमांसमोर बंडखोर आमदार हिंदुत्वाचा मुद्दा मांडत असले, तरी बंड करण्यामागे ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाच्या कारवाईची भीती असल्याचाही आरोप केला जातोय. याबाबत बंडखोर आमदारांचे नेते दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुवाहटीमधून ऑनलाईन पद्दतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक केसरकर म्हणाले, “२-३ आमदारांवर ईडीचा दबाव असेल, पण बाकीची शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांना भेटच न मिळाल्यामुळे दरी निर्माण झाली. या आमदारांना एकमेव भेटणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे होते. त्याचं प्रेम वाढलं आणि त्यामुळं हे झालं. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगत होतं की, तुम्ही भाजपासोबत सरकार बनवा. भाजपासोबत निवडणूक लढवली आहे, मग त्यांच्यासोबत सरकार बनवायला काय हरकत आहे.”

“विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार”

“मुंबईतून आमचा नेता बदलला, पण आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. ५५ आमदारांचा नेता १६ जण कसा बदलणार? विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत. आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही, केवळ ते असं भासवलं जातंय. आम्ही कुठलीही संघटना तोडत नाही, जे काल होतं, ते आजही आहे. आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो. त्यांच्याविरोधात आम्ही काहीही बोलणार नाही,” असं केसरकर यांनी नमूद केलं.

“पंतप्रधान कार्यालयातून मला बोलावणं आलं होतं, पण…”

दीपक केसरकर पुढे म्हणाले, “मी राष्ट्रवादीत होतो, तेव्हापासून माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र, सगळे शिवसेनेचे नेते माझ्याकडे तक्रार करत होते. २ नंबरच्या पक्षाला महत्त्व दिलं गेलं, त्यांच्या लोकांना मोठं करत होते. उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. कोकणात लढलो, पंतप्रधान कार्यालयातून मला बोलावणं आलं होतं, पण मी गेलो नाही.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं, पण…”; दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

“पंतप्रधानांना मातोश्रीबद्दल जिव्हाळा आहे”

“सुरुवातीपासून मी उद्धव ठाकरे यांना सांगतोय, तुम्ही आणि भाजप एकत्र राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री व पंतप्रधान एकत्र चालतात तेव्हाच महाराष्ट्र मोठा होतो. जर तुम्हाला राज्यातील लोक त्रास देतात, तर पंतप्रधानांकडे बोलता आलं असतं. पंतप्रधानांना मातोश्रीबद्दल जिव्हाळा आहे,” असं केसरकर यांनी सांगितलं. संजय राऊत फायरी आहेत. त्यांच्या बोलण्याने आग लागते. ते विधीमंडळाचे सदस्य नाही. त्यांच्याशी माझा संबंध येत नाही. त्यांच्याबद्दल मला आदर आहे, असंही केसरकरांनी नमूद केलं.