मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासह शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्तेही अयोध्येला गेले आहेत. या दौऱ्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी टीकास्र सोडले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर भाष्य केले.
“हा श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कसे करता येईल, यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते,” असं शरद पवारांनी म्हटलं होते.
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदेंकडून बंडाचा प्रयत्न? राऊतांचा मोठा दावा; नेमकं काय म्हणाले
याला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. आम्ही कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. सततच्या पावसाने हैराण असलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही दिली नाही, तेवढी मदत देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली. थेट त्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले,” असं दीपक केसरकरांनी सांगितले.
“केवळ तोंडाने बोलायचे आणि शेतकऱ्यांसाठी काही करायचे नाही. भू-विकास बँकेचा प्रश्न कित्येक दिवस प्रलंबित होता. तेथील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तातडीने मिटवून, त्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले. त्यामुळे लोकांची सेवा कशी करावी, हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही,” अशी टीका दीपक केसरकरांनी शरद पवारांवर केली आहे.
हेही वाचा : “प्रभू श्रीरामाच्या जन्माचे पुरावे मागणारे घरी बसलेत”, देवेंद्र फडणवीसांचा अयोध्येतून विरोधकांवर हल्लाबोल
“लोकांची सेवा करणाऱ्या राज्याला ‘रामराज्य’ म्हटले जाते. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर आम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवतो, त्या श्रीरामाची पुजा केली, तर काय बिघडले,” असा सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केला आहे.