शिवसेना नेत्या दीपाली सय्यद दिल्लीत असून त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्रात आधी आणि आता जी राजकीय उलथापालथ झाली त्यात अमित शाहांचाच मोठा हात असल्याचं म्हटलं. तसेच त्यामुळे शाहांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “अमित शाहांची देखील भेट घेणार आहे. कारण त्यांच्याशिवाय काहीच हालत नाही. तिथेच जाऊन चर्चा अडकते. प्रत्येकवेळी त्यांनीच सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी राजकारणात जी उलथापालथ झाली होती तेव्हाही त्यात अमित शाहांचा हात होता आणि आताही जे घडतंय त्यातही शाहांचा हात आहे. त्यामुळे मला वाटतं सर्वात आधी त्यांना भेटलं पाहिजे.”
“प्रत्येकजण माध्यमांमधून समोरचे किती वाईट, कसा धोका दिला सांगत आहे”
“मनात असेल तर नाती कितीही फाटली तरी ती पुन्हा व्यवस्थित करता येतात. मला वाटतं कुठंतरी काहीतरी नक्की मार्ग निघेल. कुणीही मी बाळासाहेबांना माझा देव मानत नाही, मी शिवसैनिक नाही असं म्हणत नाही. मग कुठे आडतंय, का कुणी पुढाकार घेत नाही? का एकत्र येण्याचा प्रयत्न केला जात नाही. प्रत्येकजण माध्यमांमधून समोरचे किती वाईट आहे, कसा धोका दिला हे सांगत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
संजय राऊतांना भेटणार का असा विचारलं असता दीपाली सय्यद यांनी राऊतांनाही भेटणार असल्याचं नमूद केलं.
“संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”
दीपाली सय्यद म्हणाल्या, “आजची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहिली. यानंतर मी संजय राऊत यांना एवढंच सांगेल की त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी. त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेऊन त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर आणल्या, तशीच मुलाखत एकनाथ शिंदेंची घ्यावी. तसं झालं तर एकत्र येऊन काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल.”
“मी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार”
“महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच स्तरावर गेलंय हे सर्वांनाच माहिती आहे. मी शिवसेनेची कार्यकर्ता, नेता आहे. त्यामुळे यात मध्यस्थी होऊन पुन्हा आमचं घर एकत्र उभं राहावं. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आजही मी दिल्लीत आहे आणि अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. यात काही शिवसेनेचे नेते आहेत, तर काही भाजपाचे नेते आहेत. सगळ्यांना भेटत आहे, लवकरच काहीना काही निर्णय होईल,” अशी आशाही दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : तुम्ही रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का? उद्धव ठाकरे म्हणाले…
कोणत्या भाजपा नेत्यांना भेटत आहात या प्रश्नावर दीपाली सय्यद म्हणाल्या, “भाजपाचे जे नेते भेटतील त्यांना भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे.”