Deepika Padukone On Slam L&T chairman : लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी कामाच्या ठिकाणचे वर्क कल्चर आणि रविवारच्या दिवशीही काम करण्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. या मुद्द्यावर आता प्रसिद्ध बॉल वूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील प्रतिक्रिया दिली आहे. दीपीकाने इतक्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसंच तिने मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.
L&T चे चेअरमन नेमकं काय म्हणाले?
लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो अजूनही कर्मचार्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे. यावर सुब्रह्मण्यन म्हणाले की, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो”.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”
सुब्रह्मण्यन यांच्या या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडीटवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करत आहे. सुब्रह्मण्यन यांच्या या विधानामुळे पुन्हा वर्क लाईफ बॅलेन्सचा मुद्दा चर्चेत आला आहे.
दीपीका काय म्हणाली?
दीपीकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून यासंबंधीत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पत्रकार फये डिसूझा यांच्या या वक्तव्यासंबंधीच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपीकाने आपल्या स्टोरीत मेंटल हेल्थ मॅटर (#MentalHealthMatters) असा हॅशटॅग वापरून म्हटले आहे की, “एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसला.”