भाजप नेत्यांची कबुली

मुख्यमंत्रिपदावरून बी. एस. येडियुरप्पांना हटविण्याचा निर्णय आणि विकोपाला गेलेला पक्षांतर्गत कलह यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला, अशी कबुली पक्षातील अनेक नेते खाजगीत देत आहेत.

कर्नाटकातील पराभवानंतर भाजप संसदीय पक्षाची बुधवारी सायंकाळी दिल्लीत बैठक झाली. पक्षाचे दक्षिण प्रवेशाचे द्वार म्हणून नावाजलेल्या कर्नाटकात पक्षाला राष्ट्रीय पातळीवर अनेक घोटाळ्यांपायी नाचक्की होत असलेल्या काँग्रेसने धूळ चारली, ही गोष्ट अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. २००७ मध्ये ज्या राज्यात पक्षाने ११० जागा जिंकल्या होत्या तेथे आता ४० जागांवर पक्ष फेकला गेला आहे.

येडीयुरप्पा यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदावरून काढले आणि नंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. कर्नाटक लोकायुक्तांनी भूखंड घोटाळ्यात त्यांना दोषी जाहीर केल्यानंतर त्यांनी जुलै २०११ मध्ये मुख्यमंत्रीपद सोडले होते. तरी नव्या सरकारवर आपला अंकुश राहील, अशी त्यांची धडपड होती. पक्षाने ती धुडकावल्यावर नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि नवा पक्ष काढला. या निवडणुकीत भाजपला नामोहरम करण्यासाठी त्यांनी चंग बांधला होता. त्याचे प्रत्यंतर निवडणूक निकालातून आल्याचे अनेकांचे मत आहे.