भाजपानं मध्य प्रदेशाची सत्ता राखल्याचा आणि काँग्रेसच्या हातून राजस्थान व छत्तीसगड ही महत्वाची राज्ये गेल्याचा परिणाम विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवली आहे. ‘इंडिया’ आघाडीतील कुठल्याही पक्षाशी काँग्रेसनं युतीबाबत चर्चा केली नव्हती. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सुनावलं आहे.
“इंडिया आघाडीतील पक्षाशी जागावाटबाबत काँग्रेसनं चर्चा केली नाही. त्यामुळे तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. हा काँग्रेसचा पराभव आहे, जनतेचा नाही,” असं ममता बॅनर्जींनी सांगितलं.
“काँग्रेसला जागावाटपाचा सल्ला दिला होता”
“तेलंगणात काँग्रेसचा विजय झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाचा विजय झाला असता. पण, इंडिया आघाडीतील काही पक्षांमुळे काँग्रेसच्या मतांचं विभाजन झालं. आम्ही काँग्रेसला जागावाटपाचा सल्ला दिला होता. पण, मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“…तर २०२४ साली भाजपा सत्तेत येणार नाही”
“विचारधारेबरोबर एका रणनीतीची सुद्धा आवश्यकता असते. जागावाटप योग्य पद्धतीनं झालं, तर २०२४ साली भाजपा सत्तेत येणार नाही. इंडिया आघाडी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी एकत्रितरित्या मिळून काम करेल आणि चुका सुधारेल,” असा विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला.
“सगळीकडे काँग्रेसचा पराभव”
“मिझोराममध्ये काँग्रेसने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते. पण, फक्त एका उमेदवाराचा विजय झाला आहे. तेलंगणात सोडून बाकी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.