संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका नौदल सेवेत दाखल झाली. युद्धनौकेवर प्रथमच तिरंगा आणि नौदलाचा झेंडा फडकवण्याचा शानदार कार्यक्रम पार पडला. सुमारे ७४०० टन वजनाची आयएनएस विशाखापट्टनम ही 15B प्रकारातील पहिली युद्धनौका असून आणखी ३ युद्धनौकांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. विशाखापट्टनम कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाची सागरी शक्ती वाढत आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. तर सागरी सीमा या विषयावरून चीनचे नाव न घेता राजनाथ सिंह यांनी सडकून टीका केली. 

“१९९२ आंतरराष्ट्रीय सागरी सीमेबाबत, विशेष आर्थिक क्षेत्र याबद्दलचे नियम निश्चित करण्यात आले होते. मात्र काही बेजबाबदार देश स्वतःच्या हिताकरता अरुंद मार्गांबाबत एकाधिकार वापरत आहेत, सागरी सीमा पाळत नाहीयेत, सागरी सीमेबाबत मनमानी व्याख्या करत आहेत”, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगत चीनचे नाव न घेता टीका केली. 

“भारत एक जवाबदार देश आहे, युद्धनौकांची बांधणी करणाऱ्या नौदलाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जगभरात सीमा वाद ( border disputes ) आहेत, जगभरातील देश लष्करी ताकद वाढवत आहेत. २०२३ मध्ये जगभरात संरक्षण दलावरील खर्च हा २.१ ट्रेलियन डॉलर्स पर्यंत जाणार आहे. एवढा तर काही देशांचे वर्षभराचे बजेटही नसेल. संरक्षण दलावरील खर्चात पुढील काही वर्षात आणखी वाढ होणार आहे”, असं मतही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

नौदलाचे ९० टक्के स्वदेशीकरण झालेलं आहे. ३९ युद्धनौकांची बांधणी देशात वेगाने सुरू आहे. ‘विक्रांत’वरही काम जोरात सुरू आहे. करोना काळ असतांनाही यामध्ये खंड पडलेला नाही. समुद्रातील दोन दीर्घ काळ चाचण्यांचा टप्पा पार पडलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना ‘विक्रांत’ नौदल सेवेत दाखल होईल, यापेक्षा कुठला सुवर्ण क्षण असू शकतो ? असंही राजनाथ सिंह म्हणाले. 

हेही वाचा : संरक्षण दलाचे Ordinance Factory Board विसर्जित, ७ कंपन्यात केले रुपांतर

आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल झाल्यावर याच आठवड्यात ‘आयएनएस वेला’ ही कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे.

Story img Loader