जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी सियाचेनची हवाई पाहणी केली, तसेच तळशिबिरावरील सैनिकांशी संवाद साधला.
लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्यासोबत संरक्षणमंत्री सकाळी लडाख भागातील थोईज भागात उतरले. तेथून ते हेलिकॉप्टरने सियाचेन बेस कॅम्पला रवाना झाले व तेथे त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. नंतर सैनिकांशी संवाद साधताना पर्रिकर यांनी त्यांचे धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा याबद्दल प्रशंसा केली.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले पर्रिकर यांना सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागातील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर त्यांनी सियाचेनचा समावेश असलेल्या उत्तरेकडील हिमपर्वतीय भागाची हवाई पाहणी केली.
येथून लेह येथे गेलेल्या पर्रिकर यांना लष्कराच्या १४ कॉर्प्सने चीनकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि पाकिस्तानकडील नियंत्रण रेषा येथील परिस्थितीबाबत थोडक्यात माहिती दिली.  यानंतर पर्रिकर यांनी श्रीनगरला भेट दिली. तेथे १५ कॉर्प्सचे प्रमुख ले. ज. सुब्रता साहा यांनी त्यांना घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैन्याने केलेली उपाययोजना आणि या भागात सुरू असलेल्या मोहिमांची माहिती दिली. या वेळी सैन्याने आखलेल्या ‘सद्भावना मोहिमेसह’ इतर कल्याणकारी योजनांची माहितीही त्यांना देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा