केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन शहीद औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी २० जून रोजी पूँछ येथे जाणार आहेत. दहशतवाद्यांनी रायफलमॅन औरंगजेब यांचे अपहरण केले होते आणि नंतर त्यांची क्रूरपणे गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांना निर्मला सीतारामन भेटण्यासाठी जाणार आहेत आणि कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.

१८ जून रोजी म्हणजेच सोमवारी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही शहीद जवान औरंगजेबच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. औरंगजेब हे लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान होते. ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन ते घरी निघाले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या हत्येपूर्वी त्यांना जबर मारहाण करण्यात आली त्याचा एक व्हिडिओही जारी करण्यात आला होता.

औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ आणि भावाने केंद्र सरकारला या दहशतवाद्यांचा खात्मा करून मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी केली आहे. औरंगजेबचे वडील मोहम्मद हेही माजी सैनिक आहेत. लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली होती. हिज्बुलचा कमांडर समीर टायगरला यमसदनी धाडणाऱ्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होते. दि. १६ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Story img Loader