संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात भारतीय नौदलाच्या P8I विमानातून उड्डाण केलं. P8I हे गस्ती विमान आहे. याचा उपयोग समुद्र परिसरात लांबपर्यंत शत्रूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. पाण्यात लपलेल्या पाणबुड्या शोधण्यासाठी आणि गरज पडेल तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जातो.
या उड्डाणादरम्यान नौदल अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्र्यांना विमानाची कार्यप्रणाली समजावून सांगितली. तसेच लांब अंतरावरील शत्रूंवर पाळत ठेवणं, इलेक्ट्रॉनिक युद्ध, इमेजरी इंटेलिजन्स, ASW मिशन आणि शोध आणि बचावाबाबतच्या क्षमतांचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. यावेळी विमानात दोन वैमानिक, तीन महिला अधिकार्यांसह सात नौदल अधिकारी होते.
भारताने P8I ही विमाने अमेरिकेकडून खरेदी केली आहेत. २०१३ पासूनच ही विमानं भारतीय नौदलात सामील करून घेण्यास सुरुवात झाली होती. या विमानांमुळे हिंद महासागर क्षेत्रावर (IOR) देखरेख ठेवणं भारतीय नौदलाला सहज शक्य झालं आहे.
P8I विमानाची वैशिष्ट्ये
P-8I हे भारतीय नौदलासाठी बोईंगद्वारे निर्मित लांब पल्ल्याचं बहु-मिशन विमान आहे. हे विमान प्रामुख्यानं सागरी परिसरात गस्त घालण्यासाठी वापरलं जातं. अमेरिकन नौदलाकडून वापरल्या जाणार्या P-8A पोसीडॉन मल्टी मिशन मॅरीटाइम एअरक्राफ्टचा (MMA) हा एक प्रकार आहे. भारताच्या किनारपट्टीचे आणि सागरी सीमांचं संरक्षण करण्यासाठी हे विमान तयार करण्यात आलं होतं. हे विमान पाणबुडीविरोधी युद्ध (ASW), गुप्तचर मोहीम, सागरी गस्त आणि पाळत ठेवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.