Pahalgam Terror Attack Updates Today : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. निष्पाप लोकांचे प्राण गेल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. यावर आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल, शिवाय पडद्यामागून हालचाली करणाऱ्यांनाही शिक्षा केली जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय.
“काल पहलगाम येथे धर्माला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये आपल्या देशातील निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश मोठ्या शोकसागरात बुडालो आहोत”, असं राजनाथ सिंह म्हणाले.
येत्या काळात जोरदार प्रत्युत्तर देऊ
“मी इथे भारताच्या दृढ संकल्पाचा उल्लेख करू इच्छितो. दहशतवाद आम्ही सहन करणार नाही. भारताचा प्रत्येक नागरिक या भ्याड हल्ल्याविरोधात एकजूट आहे. मी या व्यासपीठावरून देशवासीयांना आश्वस्त करतो की भारत सरकार या हल्ल्याबाबत जे आवश्यक असेल ते सगळं करेल. आम्ही फक्त त्याच लोकांपर्यंत पोहोचणार नाही ज्यांनी हा हल्ला प्रत्यक्ष केला, पण आपण त्यांच्यापर्यंतही पोहोचू, ज्यांनी पडद्यामागे राहून भारताच्या पवित्र भूमीवर असे अपवित्र कटकारस्थान रचले. भारताला कोणत्याही स्थितीत घाबरवलं जाऊ शकत नाही. यासाठी जबाबदार जे कुणी असतील, त्यांना येत्या काही काळातच जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल हे मी देशवासीयांना सांगू इच्छितो”, असा इशाराही त्यांनी दिला.
“भारत हा इतका मोठा देश आहे अशा कारवाया करून भारताला घाबरवता येणार नाही. येणाऱ्या काळात या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कठोर शिक्षा केली जाईल. ज्याप्रकारे वायूसेना, भारताच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीक निश्चिंत आहे”, असंही ते म्हणाले.
Speaking at the ‘Arjan Singh Memorial Lecture’ in New Delhi https://t.co/MyxiKpKGRz
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 23, 2025
दहशतवादाविरोधात आम्ही एकजूट असून याविरोधात भारताने शून्य सहनशील धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे याविरोधात आम्ही आवश्यक ती पावले उचलू, असंही ते म्हणाले.