तवांगकडे जाणाऱ्या ‘सेला पास’ च्या ठिकाणी बोगद्याच्या उत्खननाचे काम आज अखेर पुर्ण झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीहून आभासी कार्यक्रमाद्वारे बोगद्याचे उत्खनन पुर्ण करण्यासाठी, शेवटचा स्फोट होण्यासाठी कळ दाबली. सेला पासच्या ठिकाणी एक मोठा स्फोट होत सेला बोगद्याच्या उत्खननाचे काम पुर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
भुतान आणि तिबेट ( चीन ) च्या सीमेवरील एक मोठे शहर आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून तवांगची ओळख आहे. हिवाळ्यात काही महिने तवांगला रस्त्याने पोहचणे अशक्य असते. विशेषतः तवांगकडे जाणारा ‘सेला पास’ हा काही महिने बंद असतो. याच ठिकाणी सीमा सुरक्षा संघटना ( Border Road Organization ) दोन बोगदे बनवण्याचे काम करत आहे. साधारण १३ हजार ८०० फुट उंचीवर सेला पासच्या ठिकाणी दोन बोगदे बनवले जात आहेत. एक बोगदा १७९० मीटर लांबीचा तर दुसरा ४७५ मीटर लांबीचा असून ९८० मीटर लांबीचा आपत्कालीन मार्गही या बोगद्याच्या ठिकाणी बांधला जात आहे.
सेला बोगद्यामुळे तवांगकडे जाणारा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल, १० किलोमीटरने अंतर कमी होत प्रवासाचा कालावधीही एक तासाने कमी होणार आहे. पण त्यापेक्षा हिवाळ्यातही तवांगशी संपर्क ठेवणे, रस्ते वाहतुक सुरु ठेवणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षात सीमावर्ती भागात रस्ते वाहतुकीचे जाळे हे मजबूत करण्याचे धोरण अवलंबण्यात आलं आहे, सेला बोगदा हा त्याच कामााचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.
सेला पासच्या ठिकाणी बोगदा बांधण्याबाबत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ फेब्रुवारी २०१९ ला या बोगद्याचे भूमिपूजन केले होते, एक एप्रिल २०१९ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जून २०२२ मध्ये सेला बोगदे हे वाहतुकीसाठी सुरु होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.