पीटीआय, हैदराबाद
‘‘सशस्त्र दलांनी परंपरा जपताना नावीन्याचा अंगीकार करून, दोहोंत समतोल साधावा,’’ अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. हैदराबादजवळील दुंडीगल येथील हवाई दल अकादमीमध्ये संयुक्त पदवी प्रदान संचलन सोहळय़ास संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी परंपरा आणि नावीन्याचे महत्त्व मांडले.
संरक्षणमंत्री म्हणाले की, ‘‘फक्त परंपरांचे पालन केल्याने ही व्यवस्था तलावातील साचलेल्या पाण्यासारखी होते आणि जर त्याला नावीन्याची जोड दिली गेली तर ती वाहत्या नदीप्रमाणे जिवंत होते’’. सशस्त्र दलांमध्ये परंपरा महत्त्वाच्या आहेत. कारण त्या काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत. त्यांनी दीर्घ काळापासून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे परंपरांना योग्य महत्त्व देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
सिंह यांनी हवाई दलातील नवनियुक्त वैमानिकांना (फ्लाइंग ऑफिसर) नेहमीच नवीन विचार आणि विचारधारा जपण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, संरक्षणमंत्र्यांचे हवाई दलप्रमुख ‘एअर चीफ मार्शल’ व्ही. आर. चौधरी यांनी स्वागत केले. या सोहळय़ाद्वारे हवाई दलाच्या २५ महिलांसह एकूण २१३ छात्रांना त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विविध शाखांत औपचारिकरीत्या रुजू करण्यात आले. उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आठ जणांची भारतीय नौदलातील अधिकारी, भारतीय तटरक्षक दलात नऊ आणि मित्रदेशांतील दोन जणांना ‘िवग्ज’ प्रदान करण्यात आले. या सोहळय़ाचे प्रमुख वैशिष्टय़ असलेल्या ‘कमिशिनग सेरेमनी’मध्ये पदवीधर ‘फ्लाइट कॅडेट’ना संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे ‘स्ट्राइप्स’ प्रदान करण्यात आले. ‘फ्लाइंग ऑफिसर’ अतुल प्रकाश यांना वैमानिक अभ्यासक्रमात अव्वल क्रमांकाबद्दल राष्ट्रपती सन्मानपत्र आणि हवाई दल प्रमुख ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले.