गेल्या कित्येक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. १९९४ साली भारतीय संसदेनं पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून परत घेण्यासंदर्भात ठरावही पारित केला होता. मात्र, अद्याप त्यामध्ये यश आलेलं नाही. यासंदर्भात काश्मीरमध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. “पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तो दिवस फार दूर नाही”, असं ते म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांच्या या विधानावर चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९४७ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं यशस्वीरीत्या प्रवेश केल्याच्या निमित्ताने दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘शौर्य दिवस’ निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराचं कौतुक करतानाच पाकव्याप्त काश्मीर आणि इतर मुद्द्यांवरही भूमिका मांडली.

“भारतीयच लष्कर हे जगात सर्वोत्तम आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर पुन्हा अखंड करण्याची एक मोहीम आपण सुरू केली आहे. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान पुन्हा भारताचा भाग होत नाहीत, तोपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार नाही”, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

“तो दिवस फार दूर नाही”

दरम्यान, हे भाग भारतात समाविष्ट होण्याचा दिवस फार दूर नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. “पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दु:ख आम्ही समजू शकतो. पाकिस्ताकडून त्यांच्या हक्कांचं उल्लंघन केलं जात आहे. या बाजूला काश्मीर आणि लडाख नव्या क्षितिजाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. ही फक्त सुरुवात आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान भारतात आल्याशिवाय ही मोहीम पूर्ण होणार नाही. तो दिवस फार दूर नाही”, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defense minister rajnath singh pok gilgit baltistan integration with india pmw