पीटीआय, लंडन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची औपचारिक भेट घेतल्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा समारोप केला.सिंह यांनी बुधवारी येथील पंतप्रधान निवास व कार्यालय ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ येथे सुनक यांची भेट घेतली. त्यांनी द्विपक्षीय संरक्षण आणि आर्थिक संबंधांच्या मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा केली. सिंह यांनी भेटीदरम्यान सुनक यांना राम दरबाराची मूर्तीही अर्पण केली. ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर टिम बॅरो हेही या बैठकीला उपस्थित होते.
हेही वाचा >>>धक्कादायक! इयत्ता नववीतील विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म; म्हणाली, “प्रसूती होईपर्यंत…”
संरक्षणमंत्र्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘मी लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक मुद्दय़ांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. आम्ही संरक्षण, आर्थिक सहकार्य आणि भारत आणि ब्रिटनद्वारे शांततापूर्ण आणि स्थिर जागतिक नियम आधारित सुव्यवस्था तयार करण्याच्या मुद्दय़ांवर चर्चा केली.’’
संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीनुसार, सुनक यांनी ब्रिटन आणि भारताने एकत्रितपणे काम करण्याच्या गरजेवर भर दिला. मुक्त व्यापार करारावर (एफटीए) सुरू असलेल्या वाटाघाटी लवकरच यशस्वीपणे पूर्ण होतील, अशी आशा राजनाथ यांनी व्यक्त केली. गेल्या २२ वर्षांतील भारतीय संरक्षणमंत्र्यांची ही पहिलीच ब्रिटन भेट आहे. सिंग यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून यांचीही भेट घेतली.