देशाच्या राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. या समस्येवरुन सत्ताधारी आम आदमी सरकारवर टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेची खराब गुणवत्ता या केवळ राष्ट्रीय राजधानीच्याच समस्या नाहीत. यात केंद्राने हस्तक्षेप करून जबाबदारी घ्यावी”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ही समस्या केवळ कृषीप्रधान पंजाब आणि दिल्ली या राज्यांपुरती मर्यादीत नाही, असेही केजरीवाल म्हणाले आहेत. दिल्ली आणि पंजाबमधील आप सरकारलाच केवळ वायू प्रदुषणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदुषणाने गाठली गंभीर पातळी; नोएडामध्ये पहिली ते आठवीपर्यंत शाळा ऑनलाईन!
दिल्लीतील हवेच्या खराब गुणवत्तेबाबतचा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ केंद्र सरकारने थांबवावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. ‘आप’ची सत्ता असलेल्या पंजाबमुळे राजधानीतील प्रदूषणाची समस्या वाढल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत कबुल केलं आहे. “राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळ करण्याची ही वेळ नाही. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही पावलं उचलावीत”, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
राजधानीत वायू प्रदूषणाचा कहर
दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या ठिकाणी वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर गौतमबुद्ध नगरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आठ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.