राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या दया अर्जावर विनाकारण विलंब करण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप राजीव यांच्या मारेकऱ्यांच्या वकिलांनी केला होता.
मारेकऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद करताना त्यांचे वकील म्हणाले की, विलंबामुळे आमच्या अशिलांना बराच त्रास भोगावा लागला व सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी. काही जणांनी दयेचा अर्ज नंतर केला तरी त्यावर निर्णय घेण्यात आला. आमच्या अशिलांनी अगोदर दयेचा अर्ज केलेला असतानाही त्यावर विलंब करण्यात आला.
मे २०१२ रोजी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या संदर्भातील याचिका मद्रास उच्च न्यायालयाने आमच्याकडे पाठवाव्यात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. एल. के. व्यंकट यांनी या सर्व याचिका तामिळनाडूतून काढून घेऊन दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती, कारण त्या वेळचे वातावरण हे या आरोपींच्या बाजूने होते.
मद्रास उच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०११ रोजी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या फाशीला स्थगिती दिली होती व केंद्र तसेच राज्य सरकारला नोटीस दिली होती. दयेच्या याचिकांवर ११ वर्षे चार महिने विलंब झाला आहे, त्यामुळे राज्यघटनेतील जीवनाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या कलम २१चा भंग होत आहे असे त्यांचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयाने २१ जानेवारी रोजी असा निकाल दिला की, फाशीची शिक्षा झालेल्या व दयेच्या अर्जावर निर्णयास विलंब झालेल्या गुन्हेगारांची फाशीची शिक्षा कमी करून ती जन्मठेपेत परिवर्तित केली जाऊ शकते. त्या वेळी वीरप्पन टोळीतील १५ गुन्हेगारांची फाशी स्थगित करून त्यांना जन्मठेप देण्यात आली होती. न्यायालयाने असे सांगितले, की फाशीची शिक्षा रेंगाळत ठेवण्याने कैद्यांवर अमानवी परिणाम होतात व त्यांना दयेच्या अर्जास विलंब लागल्याने सतत मृत्यूच्या छायेत वावरावे लागते.
‘अफझलची फाशी असमर्थनीय’
सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना दयेच्या अर्जावर निर्णयास विलंब झाल्याने फाशीऐवजी जन्मठेप दिली असेल तर संसद हल्ल्यातील गुन्हेगार अफजल गुरू याची फाशीही असमर्थनीय आहे. त्यांनी आम्हाला विचारले नाही, सांगितले नाही व अफजल गुरूला फाशी दिले हे असमर्थनीय आहे. मात्र, तरीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे.
निर्णयाचे स्वागत-एम. करुणानिधी
तीनही जणांना केंद्र सरकारने मुक्त करावे. आपल्या सरकारच्या काळात थियागू, कालियापेरुमल व नलिनी यांची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित करण्यात आली होती. आता संथान, मुरुगन व पेरारीवेलन यांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप देण्यात आली आहे यामुळे आपल्याला आनंद वाटतो.
‘मुलाची फाशी रद्द झाल्याने आनंदच’
राजीव गांधी हत्या प्रकरणातील मारेकरी पेरारीवलन याची आई अरपुथम्मल हिला आज आपल्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द झाल्याने खूप आनंद झाला. आता तब्बल तेवीस वर्षांनी ती शांत झोपू शकणार आहे. न्याय व्यवस्थेवरील विश्वास व चिकाटी यांचा हा विजय आहे असे ६७ वर्षांच्या अरपुथम्मल यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, माझा मुलगा निरपराध आहे व अनेक वर्षे आपण त्याची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केले. राजकीय नेत्यांना भेटलो. वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करून बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी रद्द करून आमच्या निश्चयाचा आदर केला व एक आशा पल्लवित झाली. अनेक न्यायालयात सुनावण्या झाल्या त्यावेळी त्या उपस्थित होत्या.