दिल्लीमध्ये एका २० वर्षीय मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या मागणीला कंटाळलेल्या मुलाने आपल्या मित्राची हत्या केली. दिल्ली उत्तर झोनचे पोलीस आयुक्त आयुक्त मनोज कुमार मीणा यांनी सांगितले की, १९ जानेवारी रोजी काश्मीर गेट पोलीस ठाण्याला सदर गुन्ह्याची माहिती मिळाली. प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली की, डीडीए पार्क, मोरी गेट येथील निर्जन स्थळी एक मृतदेह पडलेला असून त्याचा चेहरा ठेचण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभाग आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. दोन्ही पथकांनी गुन्हा घडलेल्या जागेची कसून तपासणी केली. घटनास्थळी तपासणी झाल्यानंतर मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. काश्मीर गेट पोलीस ठाण्यात कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला, अशी माहिती मीणा यांनी दिली.
हत्येचा तपास करत असताना पोलिसांनी उद्यानाजवळ असलेल्या खोया मंडी, मोरी गेट येथील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासले. तसेच स्थानिक खबऱ्यांना मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी कामाला लावले. जवळपास १०० लोकांची चौकशी केल्यानंतर मृत व्यक्ती प्रमोद कुमार शुक्ला असल्याचे समोर आले. तो उत्तर प्रदेशमधील जौलोन जिल्ह्यातील रुद्रपुरा गावातील रहिवासी असल्याचेही समोर आले. खोया मंडीमधील राकेश तोमर यांच्या दुकानात तो काम करत असल्याची माहिती समोर आली. तसेच मोरी गेट येथे उभारलेल्या रैन बसेरामध्ये (थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी उभारलेला तात्पुरता निवारा) तो राहत असल्याची माहिती मिळाली असल्याचे पोलिस आयुक्त मीणा यांनी सांगितले.
मृत प्रमोदचा मोबाइल फोन हरवला होता. पोलिसांनी सदर मोबाइलच्या आयएमइआय नंबरवरून त्याचा मोबाइल शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजेश नावाच्या व्यक्तीने हा मोबाइल वापरला असल्याची माहिती मिळाली. राजेश हा बिहारमधील माधेपुरा येथील रहिवाशी आहे. तपासादरम्यान एका व्यक्तीने प्रमोद आणि राजेश यांना एकत्र शेवटचे पाहिले होते, अशी माहिती दिली. तसेच खोया मंडी येथील रैन बसेरामध्ये प्रमोद आणि राजेश एकत्र राहत होते, असेही कळले.
धक्कादायक! उशीने तोंड दाबून पतीने केली पत्नीची हत्या, त्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुतले ‘हे’ पुरावे
डीडीए पार्क, मोरी गेट येथे १७ जानेवारी रोजी प्रमोद आणि राजेश यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर राजेश बेपत्ता झाला. राजेशच्या मोबाइल लोकेशनच्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण केल्यानंतर अखेर पोलिसांनी २६ जानेवारी रोजी बिहारच्या पाटणा येथून त्याला अटक केली.
राजेशची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक खुलासे समोर आले. राजेश म्हणाला की, प्रमोद आणि तो एकमेकांचे मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रमोदकडून सातत्याने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. त्यातूनच प्रमोदची हत्या केली, अशी कबुली त्याने दिली. १७ जानेवरी रोजी राजेश आणि प्रमोदने डीडीए पार्क येथे एकत्र मद्यपान केले. त्यानंतर प्रमोदने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी राजेशला भरीस पाडले. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर राजेशने प्रमोद शुक्लाची हत्या केली.
प्रमोदची हत्या केल्यानंतर राजेशने त्याच्या खिशातील १८,५०० रुपये आणि मोबाइल लंपास केला. जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकाजवळ मोबाइल ४०० रुपयांना विकून राजेशने पहिल्यांदा पंजाबमधील अमृतसर गाठले. अमृतसरला गेल्यानंतर त्याने दहा हजार रुपयांचा नवीन मोबाइल घेतला. ज्या दुकानातून हा मोबाइल घेतला, त्या दुकानातून सदर खरेदीची पावती हस्तगत करण्यात आली आहे.