Delhi Gym Owner Murder Case : दक्षिण दिल्लीतून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. देवळी एक्स्टेंशन परिसरात बुधवारी रात्री एका २९ वर्षीय जिम ओनरची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या चेहरा आणि छातीवर चाकूने १५ वेळा सपासप वार करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मृताच्या वडिलांवर संशय व्यक्त करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. गौरव सिंघल असे या मृत तरुणाचे नाव आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार- सिंघलची हत्या वडिलांनीच केली होती. त्यांनी मुलावर चाकूने १५ वेळा वार केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. हत्येच्या घटनेपासून त्याचे वडील फरारी होते. यावेळी तपासादरम्यान वडील आणि मुलामध्ये काही गोष्टींवरून टोकाचे वाद होते, असे स्पष्ट झाले आहे. मृत गौरव सिंघल याचा गुरुवारी ७ मार्चला लग्न होणार होते; मात्र त्याआधीच वडिलांनी त्याची हत्या केली.
दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त अंकित चौहान यांनी सांगितले की, गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता राजू पार्क परिसरातील देवळी एक्स्टेंशन भागात झालेल्या हत्येबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला (पीसीआर) माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर कोणीतरी गौरवला धारदार शस्त्राचे वार करून गंभीर जखमी केल्याचे दिसून आले. गौरवला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, हत्येमागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. दिल्ली पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी एम्सच्या शवागारात ठेवला आहे. या प्रकरणी मृत गौरव सिंघलचा लहान भाऊ आणि त्याच्या नातेवाइकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. सध्या पोलीस मृताच्या वडिलांची चौकशी करीत आहेत.
जिम ओनरच्या हत्येमागे कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा कट असल्याचा आम्हाला संशय नाही, असे मृताच्या काकांनी सांगितले. त्याची हत्या कोणी केली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे कुटुंबातील अन्य सदस्य जयप्रकाश सिंघल यांनी सांगितले. घराजवळ ढोल वाजत असल्याने आम्हाला कोणतीही आरडाओरड ऐकू आली नाही. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपींना अटक करावी, अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांकडून देण्यात आली.
या हत्येप्रकरणी वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर या घटनेमागचे खरे कारण शोधण्यासाठी स्थानिक सूत्रे सक्रिय केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आम्ही या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करीत आहोत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत असल्याचे पोलिसांनी सांगितले.