दिल्लीतील अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. रविवारी सुलतानपुरी येथे एका भीषण अपघात झाला होता. कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला १२ किलोमीटपर्यंत फरफटत नेलं होतं. यानंतर तरुणीचा मृतदेह रस्त्यावर नग्नावस्थेत सापडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात तरुणीच्या मैत्रिणीने खळबळजनक खुलासे केले आहेत.
अंजली सिंग असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर, दुचाकीवर अंजलीबरोबर निधी ही तिची मैत्रिण होती. अपघातात निधीही जखमी झाली होती. पण, अपघातानंतर निधी भितीने घरी पळून गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी निधीचा जबाब नोंदवला आहे. आता निधीने अपघाताच्या रात्रीचा थरार ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितला आहे.
निधी म्हणाली, “अंजरीबरोबर १५ दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. अंजलीने मला नवीन वर्ष एकत्र साजरे करु असं सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही हॉटेलला गेलो तिथे पार्टी केली. तिथून २ वाजता बाहेर पडून घराकडे निघालो होतो. तेव्हा पहिल्यांदा आम्ही ट्रकला धडकताना वाचलो. अंजली रागात म्हणत होती, माझा बॉयफ्रेंड नाही मिळाला तर मी जीव देईन. मग, मी तिला थांबायला लावलं. पण, अंजली म्हणाली आता हळूने चालवते गाडी. आम्ही निघालो आणि एका वळणावर कारबरोबर हा अपघात झाला.”
हेही वाचा : कारखाली फरफटत नेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला?, शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर
“त्यानंतर अंजली कारखाली अडकली. ती वाचवा-वाचवा म्हणून ओरडत होती. तिचा आवाज कारमध्ये बसलेल्या लोकांना जात होता. तरी, मुद्दामून अंजलीला कारने फरफटत नेलं. कारच्या काचा काळ्या असल्याने आतमध्ये बसलेले काय करत होते, हे कळलं नाही. मात्र, आरोपींना कडक शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी मागणी निधीने केली आहे.