नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीत थरकाप उडवणारी घटना घडली होती. दिल्लीतील कंझावाला येथे एका कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं. या फरपटीत तरुणीचा मृत्यू होत, देह छिन्नविच्छिन्न झाला. १२ किलोमीटर फरपटत नेल्याने तिचा मृतदेह नग्नावस्थेत पोलिसांना सापडला. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, या अपघातानंतर दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत १८ हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच, सुरक्षेसाठी २५० पोलीस कारही ( पीसीआर व्हॅन ) तैनात करण्यात आल्या होत्या. तरुणीला १२ किलोमीटर फटपटत नेल्यावर दोन मिनीटानंतर सुलतानपूरी ते कंझावाला या मार्गावरून पोलीस कार गेली होती. पण, पोलिसांना या अपघाताची थोडीसुद्धा कल्पना आली नाही.
मृतदेह पाडण्यासाठी घेतली अनेक वळणे
अंजलीला १२ किलोमीटर फरपट नेताना तिचा कारखालील मृतदेह पडावा म्हणून ४ वेळा वळणे घेतली. तेव्हा ही कार सुलतानपुरी, अमन विहार, प्रेम नगर आणि कंझावाला पोलीस ठाण्याच्या परिसरातून गेली होती. तसेच, अंजलीला कारखाली फरपटत नेताना दीपक दहियाने पाहिलं होतं. यानंतर अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या दीपकने पोलिसांना २० वेळा फोन कॉल केला.
हेही वाचा : “अंजली वाचवा-वाचवा म्हणत होती, पण…”, दिल्ली अपघाताबाबत दुचाकीवरील मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे
१२ किलोमीटर मार्गावरून ९ वाहने गेली, पण…
सुलतानपूरी ते कंझावाला या १२ किलोमीटर मार्गावर ५ ते ६ पोलिसांच्या कार सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या होत्या. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी दीपकनं २० वेळा पोलिसांशी संवाद साधल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी ९ पोलीस कार तपास करत होत्या. मात्र, तरीही पोलीस आरोपींना पकडू शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘एनडीटिव्ही’ने याबाबत वृत्त दिलं आहे.