Delhi Accident : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा गाडीला आग लागून होरपळून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गाझीपूरमधील बाबा बँक्वेट हॉलजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाचा कारमध्येच जळून मृत्यू झाला आहे. हा मृत तरुण ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असून त्याचं १४ फेब्रुवारी रोजी लग्न होणार होतं.

कारमध्ये जळून मृत्यू झालेल्या तरुणाचं अनिल असं नाव असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, अनिलच्या भावाने या घटनेसंदर्भात बोलताना सांगितलं की,”तो दुपारच्या सुमारास लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो परत घरी आलाच नाही. त्यामुळे आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन बंद होता. त्यानंतर रात्री ११:३० च्या सुमारास पोलिसांचा आम्हाला फोन आला आणि अनिलचा अपघात झाला असून तो रुग्णालयात असल्याचं आम्हाला पोलिसांनी सांगितलं.” यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

तसेच अनिलच्या मेहुण्याच्या म्हणण्यांनुसार, “तो आणि अनिल एकत्र काम करायचे. १४ फेब्रुवारी रोजी अनिल त्यांच्या बहिणीशी लग्न करणार होता. मात्र, त्याच्या मृत्यूची घडली आहे. आम्हाला अनिलच्या काराला आग कशी लागली? हे अद्याप समजलेले नाही. आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.”

मैत्रिणीच्या लग्नस्थळाजवळ मृतदेह आढळल्याने संशय वाढला

अनिलच्या मोठ्या भावाने त्यांचा मृत्यू हा कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. तो प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी झालेला वाद हे मृत्यूचं कारण असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलचे एका दूरच्या नातेवाईकातील मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्या मुलीच्या वडिलांचा या नात्याला विरोध होता. दरम्यान, ही घटना घडली त्याच रात्री मुलीचे लग्न जवळच्या बँक्वेट हॉलमध्ये होत होते आणि अनिलनेही त्यात हजेरी लावली होती. पोलिसांच्या माहितीनुसार घटनेपूर्वी गाडीच्या आत जळत असलेल्या अनिलला वाचवण्यासाठी लोकांनी कारच्या खिडक्या तोडल्या होत्या. मात्र, तो जळून ठार झाला होता. दरम्यान, ही घटना अपघात आहे की घातपात? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Story img Loader