नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणाने अतिधोकादायक स्तर ओलांडला असून राजधानी परिक्षेत्रात शुक्रवारी काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०० या चिंताजनक पातळीवर पोहोचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद भागांमध्ये तर शुक्रवारी प्रदूषणाचा स्तर सुमारे ७०० पर्यंत गेला होता. धूर-धुळीमुळे दिल्लीचे आकाश पूर्णपणे झाकोळले गेले आहे. पुढील दोन आठवडे तरी हीच परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकाने दिले तब्बल ५०८ कोटी रुपये; ईडीचा दावा

दिल्ली शहरातील वाहनांच्या प्रदूषणामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेत जाळण्याच्या घटनांमुळे होणाऱ्या प्रचंड धुराची भर पडली आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका दिवसामध्ये शेतातील खुंट जाळण्याचे सुमारे दोन हजार प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पुढील काही दिवसांमध्ये त्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने दिल्लीकरांना गंभीर प्रदूषणाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा केंद्रीय यंत्रणांनी दिला आहे.

हवेतील पीएम २.५ चे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा ७ ते ८ पटीने वाढले असल्याने दिल्लीकरांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. स्विस समूह ‘आयक्यूएअर’च्या माहिती-विदेनुसार, शुक्रवारी दिल्लीतील प्रदूषणाने ‘धोकादायक’ श्रेणीमध्ये प्रवेश केला असून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ६४० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे.

हेही वाचा >>> जगभरातील रामभक्तांसाठी ट्रस्टकडून महत्त्वाचं आवाहन, सांगितली मंदिराची १२ वैशिष्ट्यं! जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, प्रदूषणावरून शुक्रवारी आप-भाजप-काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दिल्ली शहरापेक्षा नोएडा, गुरुग्राम वा फरीदाबाद या शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. दिल्लीच्या लोकांची बदनामी करू नका, असे पर्यावरणमंत्री गोपाल राय म्हणाले.  दिल्लीतील उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

फक्त दिल्ली नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रदूषणाची समस्या गंभीर बनली असताना केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव कुठे आहेत, असा सवाल दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला. तर या प्रदूषणाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल जबाबदार असल्याची टीका भाजपने केली. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली असून ‘आप’ सरकार आणि मोदी सरकारमुळे हे संकट उद्भवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लव्हली यांनी केला.

दिल्ली सरकारच्या उपाययोजना

खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे. मेट्रो आणि बसगाडय़ांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. हवा स्वच्छ करणारी यंत्रे आठ ऐवजी १२ तास चालवण्यात येणार आहेत. १२ तास पाणी फवारणीही करण्यात येईल. प्रदूषण विरोधी यंत्राचा वापर केला जाणार असल्याची माहिती राय यांनी दिली. मात्र, २०२१ मध्ये २० कोटी खर्च करून कॅनॉट प्लेस येथील उभारलेला ‘स्मॉग टॉवर’ बंद असून परिसराला टाळे ठोकण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi air quality index news delhi faces one of the worst air qualities zws