नवी दिल्ली : मुसळधार पावसाने दिल्ली विमानतळावर छताचा काही भाग कोसळून ४५ वर्षीय टॅक्सीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी चालक रमेश कुमार यांचा मृतदेह विच्छेदनानंतर शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवला. दरम्यान, सर्व विधी पार पडल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे कुमार यांच्या २५ वर्षीय मुलाने ‘पीटीआय’ला सांगितले.

‘विच्छेदनानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्हाला वडिलांचा मृतदेह मिळाला. अंत्यसंस्कारानंतर कुटुंबातील सर्व सदस्य चर्चा करून वडिलांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतील,’ असे रविंदर कुमार याने सांगितले. रमेश शुक्रवारी पहाटे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-१ येथे प्रवाशांची वाट पाहत होते. त्याचवेळी सलग तीन तासांच्या मुसळधार पावसाने विमानतळाच्या छताचा काही भाग खाली असलेल्या वाहनांवर कोसळला. या घटनेत रमेश कुमार यांचा मृत्यू, तर सहा जण जखमीही झाले होते.

हेही वाचा >>> इराणमध्ये अध्यक्षपदासाठी फेरमतदान; सुधारणावादी मसूद पेझेश्कियाँ आघाडीवर, पण बहुमताची हुलकावणी

मृताच्या कुटुंबासाठी २० लाख रुपयांची भरपाई सरकारने जाहीर केली, परंतु रवींदर यांनी नुकसानभरपाईच्या रकमेवर नाराजी व्यक्त केली आहे.

दिल्लीत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : तीव्र उष्णतेच्या लाटांनी हैराण झालेल्या दिल्लीकरांना शुक्रवारी पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा मिळाला. आता आगामी चार दिवसांत भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुसळधार पावसासह ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दिल्लीत शुक्रवारी मान्सून दाखल झाल्यानंतर जून महिन्यातील गेल्या ८८ वर्षांतील सर्वाधिक पाऊस कोसळला. शुक्रवारच्या जोरदार सरींनंतर शनिवारी सकाळी रोहिणी आणि बुरारीसह दिल्लीच्या काही भागांत पाऊस झाला. दरम्यान, दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोमवारीही आणखी जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुढील सात दिवसांत ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

भिंत दुर्घटनेतील ३ मृतदेह बाहेर

दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून शनिवारी तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती दिल्ली अग्निशमन दलाला पहाटे साडेपाचच्या सुमारास देण्यात आली. ढिगाऱ्याखालून तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.