IGI Airport Delhi : राजधानी दिल्लीतलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ अणूबॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दोघांना विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं आहे. या घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ५ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे दिल्लीच्या आयजीआय आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. यावेळी दोन प्रवाशांनी सुरक्षारक्षकांना विमानतळ अणूबॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. सुरक्षारक्षकांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं.
दिल्ली पोलिसांनी कलम १८२/५०५ (१) ब अंतर्गत या दोघांना अटक केली असून या दोघांची चौकशी चालू आहे. विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासन काही वेळ हाय अलर्ट मोडवर होतं. आयजीआय हे देशातलं एक प्रमुख विमानतळ असून जगभरातल्या अनेक प्रमुख शहरांना जोडतं.
जिग्नेश मालन आणि कश्यप कुमार अशी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींचं नावं आहेत. विमानतळावरील कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव केल्या जाणाऱ्या तपापसण्यांवरून दोघांनी प्रश्न उपस्थित केले होते. ५ एप्रिल रोजी हे दोघे अहमदाबादला जणाऱ्या आकासा एअरच्या विमानात चढण्यापूर्वी दोघांनी गोंधळ घातला होता. सुरक्षारक्षक सर्व प्रवाशांची तपासणी करत होते. परंतु, कश्यप आणि मालन या दोघांनी या तपासणीवर आक्षेप नोंदवला. सुरक्षा रक्षकांना त्या दोघांना सुरक्षा प्रोटोकॉल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, ‘माझ्याकडे अणूबॉम्ब आहे आणि मी या अणूबॉम्बने विमातळ उडवून देईन.’ त्याच्या या धमकीनंतर विमानतळावर गोंधळ झाला होता.
हे ही वाचा >> दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?
हे दोन्ही प्रवासी मूळचे गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी आहेत. ते बांधकाम कंत्राटदार असून रेलिंग मटेरिअलच्या खरेदीसंदर्भात एका व्यावसायिक सहकाऱ्याला भेटण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तिथून परतत असताना त्यांनी विमानतळावर अणूबॉम्बची धमकी देऊन गोंधळ घातला. दोन्ही प्रवाशांची जामिनावर सुटका करण्यात आली असून पोलीस तपास चालू आहे.