दिल्लीतील सुलतानपूरी परिसरात दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय अंजली सिंग या तरुणीचा मृत्यू झाला होता. कारने दुचाकीचा धडक दिल्यानंतर अंजलीला १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. यानंतर तरुणी नग्नावस्थेत आढळली होती. या अपघाताबाबत नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
१ जानेवारीला पहाटे २ च्या सुमारास सुलतानपूर परिसरात अंजलीच्या दुचाकीचा अपघात झाला होता. अपघातानंतर अंजलीचा मृतदेह सुलतानपूर ते कंझावाला असं १२ किलोमीटर फरपटत कारने नेलं. दुचाकीवर अंजलीची मैत्रिण निधीही होती. पण, अपघातात ती किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर निधी घरी निघून गेली. तिने कोणाजवळही अपघाताबद्दल वाच्यता केली नाही. पण, निधीबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : “अचानक निधी आणि अंजलीचं भांडण सुरू झालं आणि..” ‘त्या’ रात्री काय घडलं? मित्राने सांगितला घटनाक्रम
यापूर्वी निधीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निधीला तेलंगणात ड्रग्जची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. ६ डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली असून, तिच्याबरोबर रवी आणि समीर या दोन तरुणांना अटक केली होती. सध्या निधी जामीनावर बाहेर आहे, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
निधीने अंजलीवर केले गंभीर आरोप
पोलीस तपासावेळी अंजलीसह दुचाकीवर तिची मैत्रिणही निधी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निधीने अंजलीवर गंभीर आरोप केले होतं. “अपघातापूर्वी अंजलीने मद्यप्राशन केलं होतं. तरीही तिने दुचाकी चालवण्याचा हट्ट धरला. अपघात झाल्यावर अंजली कारखाली फरपटत गेली. मी घाबरून घरी आले आणि अपघाताबद्दल कोणालाही बोलले नाही. अपघातासाठी मद्यधुंद असलेल्या अंजलीची चूक आहे,” असं निधीने म्हटलं होतं.
“हा अपघात एक षडयंत्र…”
निधीच्या आरोपांवर अंजलीच्या आईने प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी निधीला ओळखत नाही किंवा तिला कधीही पाहिजे नाही. अंजलीने कधीही मद्यप्राशन केलं नाही. तसेच, कधीही मद्यधुंद अवस्थेत अंजली घरी आली नाही. निधी खरेच अंजलीची मैत्रिण असती तर अपघातानंतर ती निघून का गेली? हा अपघात एक षडयंत्र आहे. निधीची चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी अंजलीच्या आईने केली आहे.