जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. रामलीला मैदानात होणाऱ्या या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी भाजपा सरकारने प्रयत्न देखील केले. मात्र, त्यानंतरही अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत.
शुक्रवारपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. लोकपालची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशी विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपा सरकारच्या प्रयत्नांना अपयश
अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून सुरु होणारे आंदोलन थांबवावे, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची मदत घेत अण्णा हजारेंना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. महाजन यांनी सोमवारी हजारेंची भेटही घेतली होती. देशात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसताना आता पोकळ आश्वासनांचा काय उपयोग, असे सुनावत हजारेंनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले होते.
पुनश्च रामलीला
हजारे यांच्या या आंदोलनासाठी त्यांच्या कार्यालयाकडून मोदी सरकारकडे गेल्या चार महिन्यांपासून पत्रव्यवहार करण्यात येत होता. आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील संबंधित कार्यालयांमध्ये पाठपुरावाही केला. मात्र मोदी सरकारकडून काहीही प्रतिसाद देण्यात येत नव्हता. अखेर परवानगी नाकारल्यास तुरूंगात आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी रामलीला मैदानावर आंदोलनासाठी जागा देण्यास सरकार राजी झाले.