एकीकडे अरविंद केजरीवाल विजयाची हॅट्ट्रीक साधत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले असताना योगायोगाने आज त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांचा वाढदिवस आहे. सुनिता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत केक कापून आपला वाढदिवस आणि निवडणुकीत मिळालेलं यश दोन्हींचं सेलिब्रेशन केलं. अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या पत्नीचा वाढदिवस असून मी केक खाल्ला आहे, तुम्हालाही देईन असं मिश्किलपणे म्हटलं होतं. दरम्यान सुनिता यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना हे आपल्या वाढदिवशी मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे.

“हे माझ्या वाढदिवशी मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. हा सत्याचा विजय आहे. मला वाटतं राजकारण हे मुद्द्यांना धरुन असलं पाहिजे. विनाकारण वादग्रस्त वक्तव्य केली जाऊ नयेत अशी शिकवण राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे,” असं मत सुनिता केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे.

आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे – अरविंद केजरीवाल<br />हा दिल्लीचा नाही तर भारतमातेचा विजय असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील नागरिकांचे आभार मानले आहेत. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर दिल्लीमधील आपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करत सेलिब्रशन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात आपचे कार्यकर्ते उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत त्यांचेही आभार मानले.

“दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय आहे. त्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे ज्याने मला आपला मुलगा मानून जबरदस्त समर्थन दिलं. स्वस्त वीज, चांगली शिक्षा मिळत असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे,” असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

“आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. मत त्यालाच जो शाळा बनवणार, मोहल्ला क्लिनिक बनवणार, जो २४ तास वीज देणार हा संदेश दिल्लीकरांनी दिला आहे. हा पूर्ण देशाचा विजय आहे,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

आपचे कार्यकर्ते आणि माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला आहे सांगताना अरविंद केजरीवाल यांनी यावेळी माझ्या पत्नीचा आज वाढदिवस असल्याचं सांगितलं. मी केक खाल्ला आहे तुम्हा सगळ्यांनाही देतो असं मिश्किलपणे यावेळी त्यांनी म्हटलं. दिल्लीच्या नागरिकांनी खूप विश्वासने आपल्याला विजय मिळवून दिला आहे. पुढील पाच वर्ष खूप मेहनत करायची आहे असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

Story img Loader