दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून भाजपाचा पराभव होणार हे निश्चित मानलं जात आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या खांद्यावर होती. यामुळे भाजपाचा दारुण पराभव झाल्यास जबाबदार कोण असं विचारलं असता मनोज तिवारी यांनी जो काही निकाल येईल, प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा मनोज तिवारी यांनी आत्मविश्वास व्यक्त करत भाजपानं ५५ जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं वक्तव्य केलं होतं.

मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे की, “आपण आणि भाजपामध्ये मोठं अंतर असल्याचं सध्या दिसत आहे. आम्हाला आशा आहे. जो काही निकाल येईल, प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्याची जबाबदारी आपल्यावर असेल”.

भाजपानं ५५ जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही”
याआधी मतमोजणीला सुरूवात होण्यापूर्वी मनोज तिवारी यांनी भाजपा सत्तेत येणार असल्याचा दावा केला होता. “मी निराश नाही. भाजपासाठी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे, याबद्दल मला विश्वास आहे. भाजपानं ५५ जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही,” असं तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.