Delhi Assembly Election 2020: आम आदमी पक्षाची साथ सोडून काँग्रेसचा हात धरलेल्या अलका लांबा यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. अलका लांबा काँग्रेसच्या तिकीटावर चांदनी चौकातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१५ मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा विजय झाला होता. सध्याचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार अलका लांबा पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव झाल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. निवडणुकीच्या तोंडावरच अलका लांबा यांनी आपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काही दिवसांपुर्वी दिल्लीत मतदान केंद्राबाहेर अलका लांबा आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. संतापलेल्या अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्याच्या कानाखाली मारण्यासाठी हातही उगारला होता. अलका लांबा यांच्या मुलावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या चिडल्या होत्या.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. भाजपा, आप आणि काँग्रेस असे तीन पक्ष निवडणुकीला सामोर जात असले, तरी केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातच खरी लढत होत आहे. राष्ट्रवाद आणि विकास या दोन मुद्यांभोवती दिल्ली विधानसभेचा प्रचार फिरला. मतदानपूर्व चाचण्या आणि एग्झिट पोलमध्ये दिल्लीत पुन्हा ‘आप’ सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, दिल्लीकर राष्ट्रवादाला कौल देतात की विकासाला याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली असून, दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
आपचं सरकार येणार ?
दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ५० हून जास्त जागांवर आप आघाडीवर आहे. यामुळे अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार असल्याचं जवळपास निश्चित असून दिल्लीत पुन्हा आपचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे.