मतदानानंतर आज (दि.11) दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार असून मतमोजणीला सुरूवात झालीये. सर्व पक्षांनी विजयाचा दावा केलाय, पण दिल्लीच्या 12 विधानसभा जागांवर मात्र सर्वच पक्षांच्या विशेष नजरा आहेत. या जागा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. जाणून घेऊया या 12 जागांबाबत –

शकूरबस्ती: येथून केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन लढत आहेत. गेल्यावेळेस त्यांनी केवळ 3133 मतांनी विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्याविरोधात कांग्रेसकडून माजी आमदार राहिलेले एस.सी. वत्स हे भाजपाच्या तिकिटावर मैदानात आहेत. तर, काँग्रेसकडून देवराज अरोरा लढत आहेत. या जागेवर संध्याकाळी पाच वाजेनंतर 15 टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं.

नजफगड: दुसऱ्यांदा कोणालाही संधी न देणाऱ्या नजफगडमधून केजरीवाल सरकारचे मंत्री कैलाश गहलोत निवडणूक लढवत आहेत. गेल्यावेळेस त्यांनी अवघ्या दीड हजार मतांनी विजय मिळवला होता. विजयाचं कमी अंतर आणि आधीचा रेकॉर्ड यामुळे या जागेवर सगळ्यांच्या नजरा आहेत. यावेळी गहलोत यांच्याविरोधात भाजपाचे अजीत खडखडी आणि काँग्रेसचे साहिब सिंह यादव मैदानात आहेत.

मॉडेल टाउन: आपला रामराम ठोकून भाजपात आलेले कपिल मिश्रा येथून लढत असल्याने या जागेवर सर्वांच्याच नजरा आहेत. आपने अखिलेशपती त्रिपाठी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गेल्यावेळेस ते 16 हजारांहून अधिक मतांनी विजयी ठरले होते. पण यावेळेस भाजपा आमि कपिल मिश्रा यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे.

चांदनी चौक: जुन्या दिल्लीतील ही जागा चर्चेत आहे कारण गेल्यावेळेस आपच्या तिकिटावर निवडणूक जिंकणाऱ्या अलका लांबा यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे प्रहलाद सिंह साहनी यांना आपने तिकिट दिलंय. दुसरीकडे भाजपाने सुमन कुमार गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवार काँग्रेस आणि आप या पक्षांचा दबदबा राहिला आहे.

द्वारका: या जागेवर 2015 मध्ये ‘आप’च्या आदर्श शास्त्री यांनी जवळपास 40 हजार मतांनी मोठा विजय मिळवला होता. पण यावेळेस ‘आप’ने शास्त्री यांना उमेदवारी न दिल्याने समीकरणं बदलली आहेत. शास्त्री यांनी काँग्रेसचा हात पकडला असून आपने कांग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा यांना तिकिट दिलं आहे. तर भाजपाकडून माजी आमदार प्रद्युमन राजपूत लढत आहेत.

हरी नगर: पश्चिम दिल्लीच्या हरी नगर विधानसभा क्षेत्रात पंजाबी लोकांचं वास्तव्य अधिक आहे. गेल्यावेळेस येथे आपचे जगदीप सिंह विजयी ठरले होते. पण यावेळेस आपने जगदीप सिंह यांच्याऐवजी कांग्रेसमधून आलेल्या राजकुमारी ढिल्लन यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने यावेळेस येथील नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने तेजिंदरपाल बग्गा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवरील लढत महत्त्वाची मानली जात आहे.

गांधी नगर: या जागेवर आपने उमेदवार बदलला, तसेच काँग्रेसने अरविंदर सिंह लवली यांना तिकिट दिल्याने ही जागा म्हणजे हॉट सीट बनली आहे. गेल्यावेळेस येथून आपचे अनिल वाजेपयी विजयी झाले होते. पण यावेळेस ते भाजपाकडून निवडणूक लढवतायेत. आपने नवीन चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत आप उमेदवाराचा साडे सात हजाराहून कमी मतांनी विजय झाला होता.

सीलमपुर: आपने या जागेवर गेल्यावेळेस विजयी ठरलेल्या मोहम्मद इशाक यांच्याऐवजी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने मतीन अहमद आणि भाजपाने कौशल मिश्रा यांना तिकिट दिले आहे. अशाप्रकारे आप आणि भाजपा दोन्ही पक्षांचे उमेदवार नवे आहेत.

कृष्णा नगर: गेल्यावेळेस भाजपाच्या किरण बेदी येथून उमेदवार होत्या, पण आपच्या एस.के. बग्गा यांनी त्यांचा पराभव केला. अवघ्या 2277 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेस काँग्रेसचे डॉ. अशोक वालिया आणि भाजपाचे अनिल गोयल निवडणूक लढवत आहेत.

रोहिणी: भाजपाला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या तीन जागांमध्ये या जागेचा समावेश होता. भाजपाच्या विजेन्द्र गुप्ता यांनी 5367 मतांनी विजय मिळवला होता. पण काँग्रेसने या जागेवर चांगलं प्रदर्शन केल्यामुळे आप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये फुट पडली होती. त्यामुळे भाजपाचा विजय झाला होता. परिणामी यावेळेस या जागेवर सर्वांचं लक्ष आहे.

विश्वास नगर: गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या ओपी. शर्मा यांनी 10 हजार मतांनी विजय मिळवला होता. यावेळेस आपने दीपक सिंघला यांना, तर काँग्रेसने नसीब सिंह यांच्याऐवजी गुरचरण सिंह राजू यांना तिकिट दिलं आहे.

मुस्तफाबाद: गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवलेली ही तिसरी जागा. भाजपाने सहा हजार मतांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावर आपचा उमेदवार होता. यावेळी आपप ने हाजी यूनुस यांना तर काँग्रेसने अली मेहंदी यांना तिकिट दिलं आहे.

 

Story img Loader