राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपाला नाकारलं असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करु नका असं म्हटलं होतं. दिल्लीच्या जनतेने ते ऐकलं असून भाजपाला नाकारलं आहे असा टोला नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपत्ती, शक्ती आणि विरोध पराभूत होऊन विकास आणि विश्वास जिंकल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

दिल्लीकरांनी भाजपाला देशद्रोही घोषित केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करुन, मतदारांना पैसे वाटल्यानंतरही भाजपाचा पराभव झाला असं त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करु नका असं म्हटलं होतं. दिल्लीच्या जनतेने त्यांचं ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं आहे. जनतेला जो सल्ला दिला होता तो जनतेने ऐकला”.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. भाजपा, आप आणि काँग्रेस असे तीन पक्ष निवडणुकीला सामोर जात असले, तरी केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातच खरी लढत होत आहे. राष्ट्रवाद आणि विकास या दोन मुद्यांभोवती दिल्ली विधानसभेचा प्रचार फिरला. मतदानपूर्व चाचण्या आणि एग्झिट पोलमध्ये दिल्लीत पुन्हा ‘आप’ सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, दिल्लीकर राष्ट्रवादाला कौल देतात की विकासाला याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली असून, दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

आपचं सरकार येणार ?
दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ५० हून जास्त जागांवर आप आघाडीवर आहे. यामुळे अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार असल्याचं जवळपास निश्चित असून दिल्लीत पुन्हा आपचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे.