दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दिल्लीमधील मतदारांनी भाजपाला पुन्हा एकदा नाकारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमधील निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने एका नव्या पायंड्याची सुरुवात केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारलं आहे. अंहकाराला कोणीच समर्थन देऊ शकत नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

दिल्लीत प्रचारासाठी भाजपाचे १२ मुख्यमंत्री गेले होते. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्रीही तिथे गेले होते. काही पदाधिकारीही तिथे जाऊन बसले होते. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री आमित शाहदेखील होते. मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. पण तरीही सर्वसामान्यांनी जो कौल दिला आह त्याचा खूप आनंद आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“लोकसभेत नरेंद्र मोदींच्या बाजूने लोकांनी अनपेक्षित कौल दिला होता. त्यावेळी काही वेगळी कारणं होती. निवडणुकीच्या काही महिन्यांपुर्वी हल्ला झाला होता. लोक भावनिक होते. त्याचा फायदा त्यांना घेतला जे चुकीचं होतं. लोकांच्या दैनंदिन समस्यांवर बोललं पाहिजे. त्या सोजवल्या जाणं जास्त महत्त्वाचं आहे,” असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं.

आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020 : भाजपाच्या अहंकाराचा दिल्लीत पराभव : शिवसेना

“दिल्लीत सत्याचा विजय झाला आहे. अनेक लोकांना अहंकार, मोठा आत्मविश्वास होता पण तसं झालं नाही. महाराष्ट्रात सर्वात आधी भाजपाच्या विरोधात मतदार गेले. तसंच दिल्लीत झालं. महाराष्ट्रात ज्याची सुरुवात झाली त्यानंतर अनेक राज्यात भाजपाच्या विरोधातील कौल पाहिला. उत्तर प्रदेश, बंगालमधील निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे. तिथे काय होईल हे सांगू शकत नाही,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रादेशिक पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन केलं.

आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020: दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारलं – नवाब मलिक

काँग्रेसकडे अभ्यासू नेते आहेत पण संघटनेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. निवडणुकीत शाहीनबागच्या मुद्द्याचा उल्लेख करण्यावरुन टीका करताना रोहित पवार यांनी, “शाहीनबागमध्ये लोक त्यांच्या हक्कासाठी बसले आहेत. झालेल्या कामावर बोलायचं सोडून लोकांना इतर गोष्टी सांगत बसलात. लोक हुशार आहेत..लोकांना या गोष्टी कळतात. तुम्ही मन विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचं लोकांना कळतं,” असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.