दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून आम आदमी पक्षाने स्पष्ट आघाडी घेतली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित आहे. दरम्यान राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर ज्यांनी पक्षाची रणनीती ठरवली होती त्यांनी दिल्लीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. प्रशांत किशोर यांनी दिल्लीकरांनी भारताच्या आत्म्याचं रक्षण केलं असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

दिल्लीच्या निकालावर ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “धन्यवाद दिल्ली….भारताच्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल”.

दिल्लीत आम आदमी पक्ष स्पष्ट बहुमताने विजय मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. ७० जागांच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार असल्याचं जवळपास निश्चित असून दिल्लीत पुन्हा आपचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे.

भाजपा, आप आणि काँग्रेस असे तीन पक्ष निवडणुकीला सामोर जात असले, तरी केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातच खरी लढत होत आहे. राष्ट्रवाद आणि विकास या दोन मुद्यांभोवती दिल्ली विधानसभेचा प्रचार फिरला. मतदानपूर्व चाचण्या आणि एग्झिट पोलमध्ये दिल्लीत पुन्हा ‘आप’ सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, दिल्लीकर राष्ट्रवादाला कौल देतात की विकासाला याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली असून, दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.