दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्लीच्या सत्तेत विराजमान होणार आहे. भाजपा आणि आप विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला सलग दुसऱ्या निवडणुकीत भोपळाही भोडता आलेला नाही. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “दिल्लीमध्ये काँग्रेसचं काय होणार हे याची कल्पना आम्हाला अगोदरच होती,” असं कमलनाथ म्हणाले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा ‘आप’नं बाजी मारली आहे. स्पष्ट बहुमत घेऊन आप सत्तेत बसणार असून, भाजपाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तर काँग्रेस मानहानीकारक पराभव झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसला यावेळीही एकही जागा मिळालेली नाही.

काँग्रेसच्या अपयशावर बोलताना काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा निकाल माहित होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या परिणामाची आम्हाला कल्पना होती. मात्र, खरा प्रश्न भाजपाचा आहे. भाजपानं मोठमोठे दावे केले होते, त्यांचं काय झालं?,” असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020 : दिल्ली काँग्रेस अध्यक्षांनी स्वीकारला पराभव, म्हणाले…

काँग्रेसनं पराभव स्वीकारला –

निकालानंतर जनतेनं दिलेला जनादेश मान्य असल्याचं सांगत काँग्रेसनं पराभव स्वीकारला आहे. “या पराभवानं काँग्रेस हाताश झालेली नाही. यापुढील काळातही काँग्रेस दिल्लीच्या विकास लक्ष ठेवेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले. तरीही अपयश आलं. मात्र, प्रत्येक निवडणूक शिकवत असते. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये या पराभवामुळे नाराजी नाही,” असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.