Delhi Assembly Elections 2025 Congress : दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. वेगवेगळ्या योजनांचं अमिष दाखवत आहेत. अशातच काँग्रेसने दिल्लीतील बौद्ध समुदायातील लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकल्यास बौद्ध धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणारी मोफत तीर्थयात्रा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. वायव्य दिल्लीचे माजी खासदार उदित राज यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले, “सध्या दिल्लीत बौद्ध स्थळांची तीर्थयात्रा घडवणारी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. आमचं सरकार आल्यास आम्ही अशी मोफत तीर्थयात्रा चालू करू”. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याच्या बाबतीत दिल्लीतलं आम आदमी पार्टीचं सरकार भेदभाव करत असल्याचा आरोपही उदीत राज यांनी यावेळी केला.
उदीत राज म्हणाले, “दिल्लीतलं आप सरकार तिरपुती, अयोध्या व वैष्णोदेवीसारख्या तीर्थ स्थळांची मोफत यात्रा आयोजित करतं. परंतु, या तीर्थयात्रा एकाच समुदायासाठी असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी तिरुपती, अयोध्या, वैष्णोदेवी, बालाजी या तीर्थयात्रेची व्यवस्था स्वखर्चाने करतं. मात्र, सारनाथ, बोधगया, लुंबिनी, दीक्षाभूमी, महू यांसारख्या बौद्ध स्थळांना मोफत तीर्थयात्रेची योजना का नाही? दिल्लीत आमचं सरकार आल्यावर आम्ही मात्र असा भेदभाव करणार नाही. बौद्ध धार्मिक स्थळांच्या मोफत तीर्थयात्रेची व्यवस्था करू.”
आप सरकार दिल्लीतल्या ज्येष्ठ नागरिकांना १५ धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा घडवतं
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील वेगवेगळ्या तीर्थयात्रा आयोजित करतं. या माध्यमातून लोकांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवलं जातं. यासाठी २०१९ मध्ये केजरीवाल यांच्या सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत अयोध्या, द्वारकाधीश, पुरी, वाराणसी, माता वैष्णोदेवी धाम, अजमेर शरीफ, रामेश्वरम, शिर्डी, तिरुपती बालाजी व अमृतसरसह १५ धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा घडवली जाते.
उदित राज यांचा आप सरकारला प्रश्न
याआधी उदीत राज यांनी म्हटलं की काँग्रेसने आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने आंदोलन केलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं होतं की तुम्ही बौद्ध भिक्षू, रविदास व वाल्मिकी मंदिरांमधील पुजाऱ्यांसांठी १८,००० रुपयांच्या सन्मान निधीची घोषणा का केली नाही? अद्याप त्यावर आप्हाला व दिल्लीतल्या जनतेला उत्तर मिळालेलं नाही.