नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय घरामध्ये आनंदाची लाट आली असून हा मध्यमवर्गीयांसाठीचा आतापर्यंतचा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प असल्याची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवस उरले असताना पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील आर के पुरम भागात जाहीर सभा घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी ‘मोदींच्या हमी’चा उल्लेख केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात मोठी सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यावर मोदी म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कधीही वार्षिक उत्पन्न १२ लाख असलेल्यांना इतका मोठा दिलासा मिळाला नव्हता. भारताच्या इतिहासात आपल्यासाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प असल्याचे मध्यमवर्गीय म्हणत आहेत.”
एक तास केलेल्या भाषणामध्ये मोदींनी, देशाच्या प्रगतीमध्ये मध्यमवर्गीयांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. प्रामाणिक करदात्यांचा भाजप आदर करतो असे ते म्हणाले. भाजप यंदाच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या सर्व तरतुदींचा त्यांनी उल्लेख केला.
‘मतदानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान’
दिल्लीमधील झोपडपट्टीवासीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना निवडणुकीत मतदानापासून वंचित ठेवण्याचे मोठे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी एक ध्वनिचित्रफित प्रसृत करून केला. आपल्याला मोठ्या प्रमाणात फोन येत असून आपला प्रतिस्पर्धी पक्ष मतदारांना तीन हजार रुपये देऊ करत असल्याचे आपल्याला सांगितले जात आहे असे केजरीवाल ध्वनिचित्रफितीत म्हणाले.
भाजपचा प्रचाराचा धडाका
भाजप दिल्लीमध्ये गेल्या २७ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. दिल्लीमध्ये ५ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. सोमवारी, ३ फेब्रुवारीला संध्याकाळी प्रचार समाप्त होणार आहे. २ फेब्रुवारी हा प्रचाराचा शेवटचा रविवार असल्यामुळे भाजपने तब्बल ८० सभा आयोजित केल्या आहेत.
वसंत पंचमीने ऋतू बदलतो. तीन दिवसांनी, ५ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये नवीन ऋतूला सुरुवात होईल. यावेळी दिल्लीमध्ये भाजप सरकार स्थापन करेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान