सीएए कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानेही जोर धरला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच भाष्य केलं. शाह म्हणाले,”दिल्लीमध्ये शाहीन बाग नकोय. मतदानाच्या दिवशी कमळाला मतदान करा. त्यामुळे निकालाच्या दिवशी आंदोलक घरी निघून जातील,” असं आवाहन अमित शाह यांनी केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होत असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर, दुसरीकडे शाहीन बागमध्ये ‘सीएए’विरोधात महिला आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाविषयी शाह यांनी भूमिका मांडली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये अमित शाह यांची भाजपाच्या सोशल मीडिया स्वयंसेवकांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संवाद साधला. ‘जीत की गुंज’ या कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, “आपल्याला अशी दिल्ली हवी आहे की, जी प्रदूषण मुक्त हवी. प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं. २४ तास वीज उपलब्ध असावी. मुलांच्या चांगल्या शिक्षणाची सुविधा असावी. झोपडपट्टी मुक्त व्हावी. वाहतूक कोंडीपासून मुक्त असावी आणि कधीही शाहीन बाग न व्होवो, अशी दिल्ली आपल्याला हवी आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीपासून दूर राहून लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपाला मतदान करतील तेव्हाच अशी दिल्ली बनवली जाऊ शकते,” असं आवाहन शाह यांनी केलं.

यावेळी शाह यांनी विरोधकांवरही शरसंधान केलं. “हे अजूनही आपण शाहीन बागसोबत असल्याचं म्हणत आहेत. आज एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो बघा. हे म्हणत असताना विरोधकांना लाज पण वाटत नाही. मतांच्या लालचीपणामुळे त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आहे,” अशी टीका शाह यांनी केली.

Story img Loader