Delhi Election Results History: राजधानी दिल्ली म्हणजे सत्तेचं केंद्र. पण दिल्लीचं स्वतंत्र प्रशासनदेखील असल्यामुळे दिल्लीतलं राजकारण दोन स्तरांवर रंगताना पाहायला मिळतं. एकीकडे दिल्लीत देशभरातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपापसांत करत असलेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे राजकारण जोर धरत असताना दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता इथल्या राजकारणात वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. दिल्ली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून नियमाप्रमाणे दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.
काय आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक?
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार १० जानेवारी रोजी निवडणुकांची अधिसूचना जारी केली जाईल. १७ जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. १८ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर २० जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असेल. यानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केले जातील.
७० विधानसभा जागांसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीकर मतदान करणार आहेत. त्यात ५८ जागा खुल्या प्रवर्गातल्या असून १२ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. दिल्लीत एकूण १ कोटी ५५ लाख मतदार असून त्यातले ८३.४९ लाख पुरूष तर ७१.७४ लाख महिला मतदार आहेत. यामध्ये २५ लाख ८९ हजार तरुण मतदार असून त्यातही २.०८ लाख नवमतदार आहेत.
काय सांगतो दिल्लीचा राजकीय इतिहास?
दिल्लीतील गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता इथे आम आदमी पक्षाचंच वर्चस्व राहिल्याचं दिसून येत आहे.
पक्ष | २०२० | २०१५ | २०१३ | २००८ | २००३ |
आप | ६२ | ६७ | २८ | ० | ० |
भाजपा | ८ | ३ | ३१ | २३ | २० |
काँग्रेस | ० | ० | ८ | ४३ | ४७ |
इतर | ० | ० | ३ | ४ | ३ |
गेल्या पाच विधानसभा निवडणुकांपैकी तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत आम आदमी पक्षानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात २०११ सालच्या भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनातून आम आदमी पक्षाचा झालेला जन्म दिल्लीच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणारा ठरला. काँग्रेससाठी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षानं दिल्लीच्या राजकारणात पाय रोवण्याचा सक्षम प्रयत्न २०१३ साली केल्याचं दिसून येतं. परिणामी त्यांना ३१ जागांवर विजयही मिळाला. पण पुढच्या दोनच वर्षांत झालेल्या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली आणि आम आदमी पक्षानं दिल्लीत ऐतिहासिक असा विजय मिळवला.